मोठी बातमी: सरकारकडून शेतकऱ्यांना ५३८० कोटींची मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पदभार स्वीकारल्यानंतर बैठक घेतली.
मुंबई: राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यामुळे दुर्लक्ष झालेल्या बळीराजाला सोमवारी सरकारच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पदभार स्वीकारल्यानंतर बैठक घेतली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५३८० कोटींची मदत जाहीर केली.
यापूर्वी राष्ट्रपती राजवटीच्या काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी परतीच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ८ हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी ही नुकसान भरपाई मिळेल. तर फळबागा आणि बारमाही पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी १८००० रुपये इतकी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली होती. तसेच ओला दुष्काळबाधित शेतकऱ्यांचा शेतसारा व त्यांच्या पाल्यांचे महाविद्यालयीन शुल्क माफ करण्याचा निर्णयही राज्यपालांनी घेतला होता.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे राज्यभरातील अनेक भागांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात गेल्याने बळीराजा हवालदिल झाला होता. यानंतर सरकार आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यभरात दौरे करून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली होती. यावेळी विरोधकांनी शेतकऱ्यांना हेक्टरी किमान २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली होती.