CM Eknath Shinde : राज्याचे माजी मंत्री आणि युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांच्या बंडाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आणि राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झालं. भाजपसोबत गेलो नाही तर ते मला तुरुंगात टाकतील, असं सांगत एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. आदित्य ठाकरे यांच्या आरोपला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया
'तो अजून लहान आहे' असं एका वाक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. राज्यात एक नंबरचं विकासकाम सुरु आहे, समृद्धी हायेव, शिवडी न्हावा शेवा, पुणे रिंग रोड, मेट्रोचं जाळं विणण्याचं काम सुरु आहे. बुलेट ट्रेनचं काम सुरु आहे. बंद पडलेले सर्व प्रकल्प आम्ही वेगाने पुढे नेत आहोत. याचा फायदा महाराष्ट्राच्या जनतेला होईल. लाखो-करोडोंची गुंतवणूक या महाराष्ट्रात येतेय, उद्योगपती महाराष्ट्राला प्राधान्य देत आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 


नेमकं काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय. एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येऊन रडले होते असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. हैदराबादच्या गितम विद्यापीठाने आयोजित केलेल्या परिसंवादात आदित्य ठाकरेंनी बंडाआधी मातोश्रीवर नेमकं काय घडलं ते सांगितलं. भाजपसोबत गेलो नाही तर मला तुरूंगात टाकतील असा एकनाथ शिंदे यांनी मातोश्री निवासस्थानी येऊन केला होता. त्यावेळी ते रडले होते असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. संबंधित चाळीस आमदार केवळ स्वत:ची जागा वाचवण्यासाठी आणि पैशांसाठी तिकडे गेले आहेत, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.


आदित्यंच्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. आदित्य सत्य बोलत आहेत असं राऊतांनी म्हटलंय. शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं असा टोला त्यांनी मारला. तर राणेंनी आदित्य ठाकरे बालीश असल्याची टीका केलीय. आदित्य ठाकरे खोटं बोलत असून राज्यात नवा गोबेल्स तयार होतोय अशी टीका केसरकरांनी केलीय. तर शिंदे रडणारा माणूस नाही, ते मजबूत शिवसैनिक आहेत अशी प्रतिक्रिया देताना केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंनी यमक जुळवत प्रतिक्रिया दिलीय.