`सत्तेसाठी आधी हिंदुत्व खुंटीला टागलं, आता पाटणाला जाऊन वेशीवर टांगलं` उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
पाटणा इथं झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत भाजला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार करण्यता आला. या बैठकीत देशभरातील 15 विरोधी पक्ष सहभागी झाले होते. यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेही सहभागी झाले होते. यावरुन भाजप-शिंदे गटाने आता निशाणा साधला आहे
Maharashtra Politics : बिहारची राजधानी पाटणात (Patna) काल विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत देशभरातील 15 पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेने ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेही (Uddhav Thckeray) सहभागी झाले होते. यावरुनच आता भाजप (BJP) आणि शिंदे गटाने (Shinde Group) उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात गेलेले काल सत्तेच्या लालसेने थेट पाटण्याला पोहोचले. सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगले होते, काल पाटणा इथं जाऊन ते वेशीवर टांगले. केवळ आणि केवळ मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या लोकांची आघाडी होणार नाही आणि झाली तरी या स्वार्थी आघाडीला लोक स्वीकारणार नाहीत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटलं आहे.
सत्तेसाठी शिवसेना पक्ष, बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवणाऱ्या अशांच्या विरोधात आम्ही एक वर्षापूर्वी उठाव केला. कालच्या बैठकीमुळे आमची भूमिका किती योग्य होती हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस, राजद, पीडीपी, राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीयू यांच्यावर कायम सडकून टीका केली होती, त्याच लोकांच्या टोळीत हे सामील झाले आहेत. याच लोकांनी हिंदुत्वाला, राम मंदिर उभारणीला आणि कलम 370 रद्द करण्याला कडाडून विरोध केला होता, हे विसरून त्यांचेच उंबरे हे झिजवत आहेत. 370 कलमाचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून एकोप्याच्या गप्पा करत आहेत अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा द्वेष हा या सर्व विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम आहे. हिंमत असेल तर त्यांनी आघाडीचा नेता जाहीर करावा. पण तसे होणार नाही. कारण प्रत्येकजण पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहात आहे. आत्मविश्वास गमावलेल्या या सर्व नेत्यांच्या चेहऱ्यावर नैराश्यच दिसत होते. मोदीजींचा पराभव करण्यासाठी १५ पक्ष एकत्र येत आहेत. हाच मोदीजींच्या कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा विजय आहे. केवळ स्वार्थासाठी एकत्र आलेल्यांना 2024 च्या निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवून देईल, असं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं.
कालच्या बैठकीत चारा घोटाळ्यात गजाआड गेलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या मांडीला मांडी लाऊन बसलेले लोक आता मुंबईतल्या भ्रष्टाचाराची आवई उठवून 1 जुलै रोजी मोर्चा काढणार आहेत. त्यांना तो नैतिक अधिकार तरी आहे का? असा सवालही मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
फडणवीस-ठाकरे आमने सामने
दरम्यान, भाजपला मेहबुबा मुफ्तींवरून टोले मारणारे उद्धव ठाकरे स्वतः मेहबुबा मुफ्तींच्याच बाजूला बसले अशी टीका काल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. तसंच पाटण्यातली बैठक हा मोदी हटाव नव्हे तर परिवार बचाव मेळावा असल्याची टीकाही देवेंद्र फडणवीसांनी केली होती. त्यावर उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. मेहबुबांच्या शेजारी मुद्दामच जाऊन बसलो असं उद्धव ठाकरे म्हणालेत.