मुंबई: कोरोना संकटानंतर आषाढी वारी सोहळा दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात पार पडत आहे. संत ज्ञानेश्वरांसह अनेक मानाच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. पायी प्रवास पूर्ण करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहचेल. तर 10 जुलैला आषाढी एकादशी साजरी होणार आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या पांडुरंगाची शासकीय महापूजा ही महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री करतात. ती सर्वोच्च शासकीय महापूजा असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी राहणार की देवेंद्र फडणवीस मुखमंत्री होणार? याबाबत चर्चा रंगली होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर शासकीय महापूजेचा प्रश्नच सुटला आहे. पंढरपुरात यंदाची आषाढी एकादशीची पूजा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला, त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी देंवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. "देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतला 120 आमदार संख्या असताना देवेंद्र फडणवीस हेही मुख्यमंत्रीपद घेऊ शकले असते, पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला, त्यांचे आणि पंतप्रधान, गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानतो. ही एक ऐतिहासिक घटना आहे.," असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. 


"राज्यातल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवसरात्र एक करु, राज्याला विकासाच्या दिशेने नेण्याचं काम नक्की केलं जाईल, देवेंद्र फडणवीस आमच्या पाठिशी आहेत, ते मंत्रीमंडळात नसले तरी राज्याच्या विकासाठी ते आमच्या सोबत आहेत. आज कालच्या राजकारणात काय मिळेल हे आपण पाहात असतो. पण मिळत असताना, घेऊ शकत असताना ते दुसऱ्याला देण्याचं उदाहरण त्यांनी दाखवलं आहे." असं सांगत एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं.