मुंबई महापालिकेच्या स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्राला मुख्यमंत्र्यांची मंजुरी
मुंबई महानगरपालिकेच्या स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंजुरी दिली आहे.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंजुरी दिली आहे. मध्य वैतरणा जलाशयातून ही वीजनिर्मिती होणार आहे. शिवसेनेने २००२ साली मुंबई महानगरपालिकेच्या वचननाम्यात स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्राचं आश्वासन दिलं होतं. या आश्वासनाची वचनपूर्ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयात मुंबई महानगरपालिकेला आपले स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्र सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. मध्य वैतरणा जलाशयातून ही वीज निर्मिती केली जाईल. याबाबतची तांत्रिक यंत्रणा कार्यान्वित होऊन त्याच्या निविदा लवकरच उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती शासनाने दिली आहे.
मध्य वैतरणा जलाशयातून २५ मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या वीजेचा खर्च या वीजनिर्मितीमुळे वाचणार आहे. याआधी तानसा धरणातूनही अशाचप्रकारे वीजनिर्मिती करण्यात येते.