मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून अधिकाऱ्यांच्या बदल्या; मातोश्रीवर पोलीस आयुक्तांची कानउघडणी
उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मातोश्रीवर बोलावून घेतले होते.
अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांच्या मुद्द्यावरुन आता आगामी काळात महाविकासआघाडीचे स्थैर्य कायम राहणार का, याविषयी साशंकता निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. कारण, या प्रकरणात मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये शह-काटशहाचे राजकारण खेळण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या या खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अंधारात ठेवून झाल्या होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मातोश्रीवर बोलावून घेतले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांची चांगलीच कानउघडणी केल्याचे समजते. यावेळी परमबीर सिंह यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, उद्धव ठाकरे त्याविषयी असमाधानी असल्याचे समजते.
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा वाद, गृहमंत्र्यांच्या स्पष्टीकरणामुळे गोंधळ आणखी वाढला
तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या तात्काळ रद्द करुन राष्ट्रवादी काँग्रेसला शह दिल्याचे मानले जाते. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या गोटातूनही प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. या सगळ्यामुळे तीन पक्षांच्या सरकारच्या स्थैर्याविषयी अनेक शंका उपस्थित करण्यात येत आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सोमवारी ठाण्यातील पत्रकारपरिषदेत यावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, प्रत्येक आयुक्ताला बदल्यांचे अधिकार असतात. केवळ गृहमंत्र्यांशी बोलून हे सगळं करावं, असा अलिखित नियम आहे. कदाचित मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. गृहमंत्र्यांनी त्यांना ब्रीफ करायला पाहिजे होते. मात्र, अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाल्यानंतर ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आली. यामध्ये सरकारमधील पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट होते. तसेच एकमेकांविषयी अविश्वास असल्याचेही दिसत आहे. परंतु, सध्याच्या परिस्थितीमध्ये असा गोंधळ असू नये, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.