मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) आणि राज्य सरकारमधील पत्र युद्ध संपूर्ण राज्याला माहितेय. राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड, शिवसेनेचे हिंदुत्व अशा विषयांवरुन दोन्ही बाजूकडून खरमरीत पत्रव्यवहार याआधी झालाय. दरम्यान गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिलंय. याआधीच्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी खास ठाकरी भाषेत राज्यपालांच्या सर्व मुद्द्यांचा समाचार घेतला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना पत्र हे राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र लिहून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यश, समृद्धी, प्रगती आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा असे या पत्रात लिहिले आहे. 



मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन


कोरोना विषाणूवर मात हीच आता आरोग्याची गुढी असेल. त्यासाठी सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री पाळावी, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज साजरा होणाऱ्या गुढी पाडव्याच्या आणि मराठी नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट गरजेची आहे. आरोग्य सेवक, परिचारीका, डॉक्टर्स यांच्यासह विविध यंत्रणातील कोविडयोद्धे अहोरात्र राबत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना साथ म्हणून गुढी पाडव्याच्या सणादिवशीही आपण घरीच थांबूया.  नेहमीच्या प्रथा-परंपरांना थोडं बाजुला ठेवून एकमेकांना शुभेच्छा देऊन सण साजरा करुया. गर्दी नकोच, मास्क अनिवार्य आणि वारंवार हात धुणे या त्रिसुत्रीतून कोरोनावर मात करणे ही आरोग्याची गुढी यावर्षी महत्वाची आहे. यातून येणारे नववर्ष आपल्या सर्वांसाठी आरोग्यदायी, सुख-समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल, असा विश्वास आहे. या आरोग्यदायी गुढीसाठी आणि मराठी नववर्ष प्रारंभाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा.