मुंबई : महाविकासआघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर, अवघ्या काही दिवसांनीच या सरकारपुढं कोरोना विषाणूचं आव्हान उभं राहिलं. राज्यातील जनतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी म्हणून प्रयत्नशील असतेवेळी हा कालावधी नेमका कसा व्यतीत होत आहे, यासह विरोधी पक्षाच्या आरोपांचा सामना आपण नेमका कसा करत आहोत, याचा उलगडा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील सहा महिन्यांच्या काळाबाबत ठाकरे सरकार नेमकं काय म्हणतंय याचीच प्रचिती आली आहे, शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत. 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रासाठी घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीची पहिली झलक अर्थात मुलाखतीचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये मुख्यमंत्र्यांना राऊतांनी नेमके कोणत्या विषयांवरील प्रश्न विचारले याचा अंदाज येत आहे. सोबतच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्या प्रश्नांची उत्तरं नेमकी कोणत्या शैलीत दिली हेसुद्धा पाहायाल मिळत आहे. 


मागील सहा महिने नेमके कसे गेले हे सांगत असताना, हे महिने आव्हान घेऊन आले होते ही बाब मुख्यमंत्र्यांनी येथे अधोरेखित केली. तर, कोरोनाचं हे संकट सरणार कधी हेच ठाऊ नसल्याचं म्हणत 'सरणार कधी रण...' या ओळींत त्यांनी परिस्थिती सर्वांपुढे मांडली. संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विट अकाऊंटवरुन या मुलाखतीचा प्रोमो शेअर केला. 



मी म्हणजे काही ट्रम्प नाही, असं म्हणत कोरोना काळात ट्रम्प सरकारच्या भूमिकेला मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीदरम्यान टोला लगावला. आपल्या डोळ्यांसमोर आपल्याच माणसांना तळमळताना पाहू शकत नसल्याची बाब त्यांनी यावेळी मांडली. मागील काही काळात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात कमीच गेल्याचा आरोपही त्यांच्यावर अनेक स्तरांतून केला गेला, आता या प्रश्नावर आणि अंतिम वर्षातील पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री नेमकं काय म्हणतात याबाबतचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं २५ आणि २६ जुलै रोजी मिळणार आहेत.