मुंबई : राज्यावरच कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. एकाबाजूला कोरोना तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षनेत्याचं आंदोलन असं असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपकडून सतत केल्या जाणाऱ्या पॅकेजच्या मागणीला धुडकावलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही पॅकेज, पॅकेज काय करता कळत नाही. सगळं काही देतो पण जे डोक्यावर आहे त्याचा तर विचार करावा. संकटात कुणीही राजकारण करू नये. आरोग्य सुविधांबाबत उपाययोजना करत नाही तोपर्यत पॅकेज जाहीर करून काय फायदा, अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाची मागणी धुडकावून लावली आहे. 


पोकळ घोषणा करणारे हे महाविकास आघाडीचे सरकार नाही. पॅकेजच्या पोकळ घोषणा करणारं हे महाराष्ट्रातलं सरकार नाही. तुम्ही राजकारण केलं तरी आम्ही राजकारण करणार नाही. कोणीही राजकारण करू नये, अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. महाराष्ट्र जनतेचा आमच्यावर विश्वास आहे, तुम्ही काहीही बोला, आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत. 


राजकारण करणं आमच्या परंपरेला शोभणार नाही़, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने पॅकेज जाहीर केलं. पण त्या पॅकेजच्या आत काहीच नाही. वरून फक्त सजवलेलं पॅकेज मात्र आता काहीच नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे. 


रस्त्यावर न उतरता घरुनच प्रार्थना करा आणि राज्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना करा असे आवाहन मुस्लिम बांधवाना मुख्यमंत्र्यांनी केेले.  कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होतेय. हा विषाणु गुणाकार करत जातो. मे महिन्याच्या शेवटी सव्वा ते दीड लाख कोरोना रुग्ण असू शकतील असा अंदाज केंद्राच्या टीमने व्यक्त केला होता. आजच्या दिवशी राज्यात ३३ हजार ६८६ रुग्ण आहेत. १३ हजार ४०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण ३ लाख ४८ हजार २६ टेस्ट झाल्या. दुर्देवाने १५७७ मृत्यू झाले आहेत.