कोरोना लढाईत धारावी मॉडेल संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक- उद्धव ठाकरे
एवढ्या मोठ्या झोपडपट्टीत आज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्क्यांवर गेले असून आज ॲक्टीव्ह केसेसची संख्या फक्त १६६ आहे.
मुंबई: आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वंयशिस्त आणि सामुहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले एवढेच नाही तर कोरोनाविरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर आपलं नाव नोंदवलं अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या . एवढ्या मोठ्या झोपडपट्टीत आज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्क्यांवर गेले असून आज ॲक्टीव्ह केसेसची संख्या फक्त १६६ आहे.
धारावीने कोरोनाचा तीव्र प्रादुर्भाव रोखला; WHOच्या प्रमुखांकडून कौतुक
मुख्यमंत्र्यांकडूनही कौतूक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासन, स्वंयसेवी संस्था आणि स्थानिक धारावीकर यांच्या एकात्मिक प्रयत्नांचे कौतूक करतांना कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामगिरीबद्दल शाब्बासकी दिली आहे. हे तुमच्या सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांचे यश असल्याचे सांगतांना त्यांनी धारावीच्या प्रयत्नांची जागतिक स्तरावर घेण्यात आलेली नोंद ही कोरोना विरुद्धच्या लढ्याला अधिक बळ देणारी असल्याचे म्हटले आहे.
चेस द व्हायरसचे यश- आदित्य ठाकरे
या वस्तीतील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणे आव्हानात्मक काम होते. हे आव्हान स्थानिक धारावीकर, महापालिका प्रशासन आणि स्वंयसेवी संस्थांनी स्वीकारले, राज्य शासनाने या सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांना बळ देण्याचे काम केले असे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले . इथली ८० टक्के लोकसंख्या ४५० सामुहिक शौचालयांचा वापर करते. बहुतेक लोकसंख्या बाहेरच्या अन्नावर अवलंबून आहे. १० बाय १० च्या घरात इथे आठ ते दहा लोक राहातात. शारिरिक अंतर पाळणे, रुग्णाला होम कॉरंटाईन करणे शक्य नव्हते. अशावेळी "चेस द व्हायरस" उपक्रमातून ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटींगची संकल्पना चार पातळीवर वेगाने राबविण्यात आली असे ते म्हणाले.
३.५ लाख लोकांचे स्क्रिनिंग
या मोहिमेत ४७ हजार ५०० घरं डॉक्टर आणि खाजगी दवाखान्यामार्फत तपासण्यात आली. ३.६ लाख लोकांचे स्कॅनिंग करण्यात आले. प्रो ॲक्टीव्ह स्क्रीनिंग, फिवर कॅम्प, अर्ली डिटेक्शन, योग्य वेळेत विलगीकरण, सुसज्ज आरोग्य सुविधा आणि कॉरंटाईन सेंटर्स यामुळे साथ नियंत्रणात ठेवता आली.
१४ हजार ९७० लोकांचे मोबाईल व्हॅन द्वारे स्कॅनिंग करण्यात आले. ८२४६ ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून सर्व्हे करण्यात आला. १४ हजार लोकांना संस्थात्मक कॉरंटाईन करून त्यांचे विलगीकरण करण्यात आले.
अन्न धान्य आणि जेवणाची पाकीटे
कंटेनमेंट झोनमधील लोकांनी बाहेर जाऊ नये म्हणून त्यांना बीएमसीकडून अन्नधान्याची २५ हजार किराणा किट तर २१ हजार जेवणाच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले.याशिवाय आमदार, खासदार आणि नगरसेवकांनीही या भागात मोफत अन्नधान्याचे वितरण केले.