मुंबई : १ जूनपासून राज्यात कोरोना लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जाणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. जनतेला लॉकडाऊन उठल्यानंतरची नियमावली समजावून सांगतांना मुख्यमंत्र्यांनी भाजपवरही निशाणा साधला. महाराष्ट्राचं सरकार कोणीही पाडू शकत नाही. राज्यातलं सरकार पूर्णपणे स्थिर आहे. जनता सोबत आहे त्यामुळे सरकार पडणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान केलं जात असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. मुंबई महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, राष्ट्रपती राजवट लावा आणि लष्कराला बोलवा असं म्हणलं जातंय, पण त्यांना आकडेवारी दाखवा. ६५ हजारातले २८ हजार रुग्ण घरी गेले आहेत. तसंच बहुतेक जणांचा कोरोना मध्यम स्वरुपाचा आहे. तर व्हॅन्टिलेटरवर असेलेले काही रुग्णही बरे झाले आहेत. महाराष्ट्राला आपलीच काही लोकं बदनाम करत आहेत, त्यामुळे दु:ख होतं. महाराष्ट्रात भयावह स्थिती नाही. दुर्दैवानं आपलीच लोकं कारस्थान करतात, असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपलाा लगावला. 


दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनाही धन्यवाद दिले. मागच्यावेळी ट्रेन उपलब्ध होत नसल्याचं बोललो तेव्हा पियुष गोयल यांनी मनाला लावून घेतलं, पण त्यानंतर मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यासाठी रेल्वेने गाड्यांची सोय केली. १६ लाख मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यात आलं. मागच्यावेळी बोललो तेव्हा पियुष गोयल यांना राग आला, पण आता मी त्यांना धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.