उद्धव ठाकरे आदित्यचं स्वप्न साकारणार! मुंबईत लवकरच नाईट लाईफ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंचं ते स्वप्न पूर्ण करणार
कृष्णात पाटील. झी मीडिया, मुंबई : मुंबईत लवकरच नाईटलाईफचा झगमगाट पाहायला मिळणार आहे. आदित्य ठाकरेंची ही संकल्पना होती. आता उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाल्यामुळे आणि नाईट लाईफ संकल्पनेला विरोध करणारी काँग्रेस महाविकासआघाडीत आल्यानं नाईट लाईफचा मार्ग मोकळा झाला आहे.
सिंगापूर, दुबई, बँकाँक या आंतरराष्ट्रीय शहरांमधल्या नाईट लाईफची चकाकती दुनिया. मुंबईतही असंच नाईट लाईफ एन्जॉय करता यावं, ही संकल्पना मांडली आणि त्याचा पाठपुरावा केला तो युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी. पण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत असलेल्या गृह विभागानं सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत नाईट लाईफच्या प्रस्तावातील हवाही काढून घेतली.
तरीही सत्ताधारी शिवसेनेने नाईट लाईफचा प्रस्ताव पालिका सभागृहात मंजूर करून तो राज्य सरकारकडे पाठवला होता. पण त्यावेळी राज्याच्या नगरविकास विभागानं त्यावर काहीच कार्यवाही केली नाही. आता मात्र नाईट लाईफच्या मार्गातले अडथळे दूर होवू लागलेत. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री झाल्यानं या प्रस्तावावर सकारात्मक कार्यवाही होणार आहे. तसंच आतापर्यंत नाईट लाईफला पालिकेत विरोध करणारी काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत सामील झाल्यानं त्यांचाही या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला आहे.
अनेक मुंबईकरांची कामाची शिफ्ट ही उशिरा सुटते, त्यामुळं त्यांनाही काही खरेदी करायची असल्यास अडचण निर्माण हाेते. म्हणून आम्ही आयुक्तांची भेट घेवून कमर्शियल दुकाने २४ तास सुरु ठेवण्याची मागणी केलीय. परंतु हॉटेल, बार २४ तास सुरु ठेवताना सुरक्षेची काळजी घेण्याची गरज आहे. इथं रात्रीच्या वेळेस समाजविघातक कृत्ये हाेण्याची शक्यता असल्यानं सर्व काळजी घेणं गरजेचे आहे, असं वक्तव्य महापालिकेतले विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे.
सिंगापूर, दुबईसारख्या शहरांमध्ये २४ तास मॉल सुरु असतात. कारण बाहेरच्या देशातून आलेले पर्यटक दिवसा पर्यटनस्थळी जातात आणि रात्री शॉपिंग करतात. त्यामुळं पर्यटकांची प्रचंड गर्दी या मॉलमध्ये रात्री दिसते. तसंच सुरक्षेची काळजी घेवून मुंबईमध्ये झाल्यास पर्यटकांची संख्या वाढून अर्थव्यवस्था वाढीस मदत होईल, असा विश्वास महापालिकेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी व्यक्त केला.
मुंबईकरांबरोबरच पर्यटकांनाही नाईट लाईफ एन्जॉय करता यावं, यासाठी सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे, त्यावर योग्य उपाययोजना झाल्या की मुंबई पार्टी ऑल नाईटसाठी सज्ज होणार आहे.