VIDEO : नारळाचं झाड अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू
चेंबूरमध्ये नारळाचं झाड अंगावर कोसळून जखमी झालेल्या कांचन नाथ या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय.
मुंबई : चेंबूरमध्ये नारळाचं झाड अंगावर कोसळून जखमी झालेल्या कांचन नाथ या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय.
रस्त्यावरुन जात असताना कांचन नाथ यांच्या अंगावर नारळाचं झाड कोसळलं होतं. चेंबूरच्या स्वस्तिक पार्क गुरुवारी सकाळी ही दुर्घटना घडली होती.
कांचन नाथ योगा क्लास आटोपून चंद्रोदय सोसायटीसमोरून जात असताना, सोसायटीतलं नारळाचं झाडं अचानक त्यांच्या अंगावर कोसळलं. काही काळ त्या झाडाखाली दबल्या... मात्र, काही लोकांनी त्यांची सुटका केली आणि खासगी रूग्णालयात भरती केलं.
कांचन बेशुद्ध होत्या... मात्र, आज उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या सोसायटीतील रहिवाशांनी हे नारळाचं झाड तोडण्याची परवानगी पालिकेच्या एम पश्चिम विभागाकडं चार महिन्यांपूर्वी मागितली होती. सोसायटीनं हे झाड तोडण्यासाठी पैसेही भरले होते. पण पालिकेनं झाड सुस्थितीत आहे, असं कारण देत तोडलं नाही... आणि त्यामुळे पालिकेच्या याच दुर्लक्षामुळे आज या महिलेचा हकनाक बळी गेला.