मुंबई : बुरेवी चक्रीवादळ निवळलं आहे. या वादळाचा राज्याच्या वातावरणावर फारसा परिणाम झालेला नाही. यामुळे पुढील २ ते ३ दिवस राज्यातील थंडी कायम राहणार आहे. यानंतर थंडीत चढउतार होणार असल्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील परभणी कृषी विद्यापीठात रविवारी ८.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली, असं हवामान विभागाच्या सुत्रांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगालच्या उपसागरात मागील आठवड्यात बुरेवी चक्रीवादळाने उत्तरेकडून बाष्प ओढून घेतले, यामुळे राज्याच्या काही भागात थंडीचा जोर वाढला आहे.


मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात ४ अंश सेल्सिअसची घट झाली आहे. राज्यातील पुणे, निफाड, परभणी या भागात किमान तापमान जवळपास दहा अंश सेल्सिअसच्या खाली आहे.


विदर्भात किमान १२ ते १८ अंश सेल्सिअस तापमान आहे. तर मराठवाड्यात हे प्रमाण किमान ८ ते १४ अंश सेल्सिअस आहे. मध्य महाराष्ट्रात मात्र थंडीचा चांगलाच जोर आहे. पुणे, अहमदनगर आणि नाशिकमध्ये थंडीने पारा घसरला आहे. कोकणात मात्र किंचित थंडी आहे. कोकणात किमान तापमान १८ ते २४ अंश सेल्सिअस आहे.