मोटारमनच्या सतर्कमुळे मुंबईत टळली रेल्वेची टक्कर!
मोटारमनच्या सतर्कतेमुळे मुंबईत आसनगाव लोकल आणि डेक्कन एक्सप्रेस यामधील टक्कर टळली आणि एक मोठा अपघात टळण्यास मदत झाली.
मुंबई : मोटारमनच्या सतर्कतेमुळे मुंबईत आसनगाव लोकल आणि डेक्कन एक्सप्रेस यामधील टक्कर टळली आणि एक मोठा अपघात टळण्यास मदत झाली.
मुझफ्फरनगरमध्ये ज्या दिवशी उत्कल एक्सप्रेसचे १३ डब्बे रस्त्यावरून घसरले आणि सुमारे २२ प्रवाशांचे प्राण गेले त्याच दिवशी कल्याण स्थानकाजवळ हा विचित्र अपघात घडला असता.
नेमका प्रकार काय झाला?
आसनगाव सीएसएमटी ही जलद लोकल कल्याणकडून सीएसएमटीकडे धावत होती. यावेळेस लोकलचे मोटारमॅन आसाराम वर्मा यांनी क्रॉसओव्हर पॉइंटवर उभ्या असलेल्या डेक्कन एक्स्प्रेसची शेवटची बोगी पाहिली. दोन्ही गाड्यांची संभाव्य टक्कर टाळण्यासाठी वर्मांनी ब्रेक मारला, अशी माहिती सेंट्रल रेल्वे मजदूर संघाकडून देण्यात आली आहे.
वेळीच धोका ओळखून अनेकांचे प्राण वाचवणार्या आसाराम वर्मांना त्यांच्या या कामाबद्दल बक्षीस मिळावे, ही मागणी केली आहे.
शनिवारी सकाळी 8 वाजले होते. कल्याणच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरुन मी निघालो. फास्ट ट्रॅकवर क्रॉसओव्हर करण्याच्या तयारीत होतो. सिग्नल क्रमांक 17 लाल असल्यामुळे 10 ते 15 मीटर अंतरावर मी थांबलो. दोन मिनिटांनी सिग्नल पिवळा झाला आणि मी निघालो. तेवढ्यात मला क्रॉसओव्हर पॉईंटला डेक्कन एक्स्प्रेसचा शेवटचा कोच दिसला आणि मी ट्रेन थांबवली. मी तसं केलं नसतं, तर ट्रेन धडकलीच असती, असे आसाराम वर्मा सांगतात.
सिग्नलमध्ये दोष असल्याने हा गोंधळ झाला असल्याची माहिती सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष विक्रम सोळंकी यांनी दिली आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी माहिती त्यांनी दिली आहे.