मुंबई : काँग्रेसमध्ये पक्ष नेतृत्व बदलाची चर्चा सुरु असताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधी यांना पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी पत्र लिहिलं आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे कार्यकारिणी सदस्य असलेले बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधींना यासाठी आवाहन केलं आहे. कम बॅक राहुलजी अशी साद त्यांनी या पत्रातून घातली आहे. फक्त काँग्रेसलाच नाही तर संपूर्ण देशाला तुमची गरज असल्याचं त्यांनी ट्विट केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदाची जबाबदारी पुढे कोण घेणार असा प्रश्न आता काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. याबद्दल पक्षात दोन मते तयार झाली आहेत.



काँग्रेसचा अध्यक्ष हे गांधी कुटुंब सोडून इतर कोणी असले पाहिजे, असे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आधीच म्हटले होते. पण राहुल गांधींनी पुढे येऊन पक्षाची जबाबदारी सांभाळावी, असे पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते वारंवार बोलत आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत काय निर्णय होणार याकडे काँग्रेस नेत्यांचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे.  


सोनिया गांधी या काँग्रेसचे अंतरिम अध्यक्षपद सोडण्याचा विचार करीत आहेत. काँग्रेसमध्ये बर्‍याच दिवसांपासून पूर्णवेळ अध्यक्ष असावा अशी मागणी होत आहे. सोनिया गांधी यांनी अंतरिम अध्यक्षपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.


संजय झा यांनी गैर-गांधी कुटुंबातील कोणीतरी काँग्रेस अध्यक्ष व्हावे अशी मागणी केली आहे. ते म्हणाले की, बिगर गांधी काँग्रेस अध्यक्षांची शक्यता शोधण्याची वेळ आली आहे. पक्ष संघटनेत पूर्ण बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या पत्रावर १०० नेत्यांनी सही केली आहे. असा दावा देखील संजय झा यांनी केला आहे.