मुंबई: कोरोनामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी बिघडली आहे. या सगळ्याचे परिणाम आता दिसायला सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनच्या २१ दिवसांच्या काळात सर्व व्यवहार ठप्प असल्याने बाजारपेठेतील पैशांचा ओघ आटला आहे. साहजिकच अनेक कंपन्यांना यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी या कंपन्यांकडून एप्रिल व मार्च महिन्यातील कर्मचाऱ्यांच्या पगाराला कात्री लावायला सुरुवात केली आहे.
 
देशभरात टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात ५०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. यानंतर आता पुन्हा एकदा या कंपनीकडून येत्या तीन महिन्यांत आणखी ५०० जणांना निरोपाचा नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय, अनेक फुड डिलिव्हरी स्टार्टअप कंपन्यांकडूनही आपापल्या कर्मचाऱ्यांना येत्या दोन महिन्यांच्या पगारात तब्बल २० ते २५ टक्क्यांची कपात केली जाईल, असे ईमेल्स पाठवले आहेत. लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांनी आखडता हात घेतल्यामुळे फुड डिलिव्हरी कंपन्यांना हा निर्णय घ्यावा लागल्याचे समजते. 

अकांऊंटिंगचे काम करणाऱ्या कंपन्यांमध्येही साधारण हीच परिस्थिती आहे. देशातील चार बड्या अकांऊटिंग कंपन्यांपैकी दोन कंपन्यांनी कोरोनामुळे एप्रिल आणि मार्च महिन्यात भागीदार आणि कार्यकारी संचालकांच्या मानधनात कपात करण्याचे ठरवले आहे. तर मुंबईतील एका अकांऊंटिंग कंपनीने कर्मचाऱ्यांचे अप्रायजल आणि बोनसची प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 

यापूर्वी अनेक विमान कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात जाहीर केली होती. इंडिगो एअरलाईन्सने कर्मचाऱ्यांचे २५ टक्के पगार कापले होते. तर गो एअरने मार्च महिन्यातील पगाराला कात्री लावणार असल्याचे जाहीर केले होत. याशिवाय, विस्तारा एअरलाईन्सने आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

मात्र, अनेक आयटी कंपन्यांत अगदी उलट परिस्थिती असल्याचे दिसत आहे. या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे. कॉग्निझंटने आपल्या बहुतांश कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात २५ टक्के बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. तर फेसबुकने यापूर्वीच आपल्या वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ७४ हजारांचा बोनस जाहीर केला होता.