मुंबई : सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस उदयाला आल्यामुळे आता विधानसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र त्यांच्यासह इतरही काही नावे स्पर्धेत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, राष्ट्रवादीने भाजप-शिवसेना युतीला सरकार बनविण्याचा हक्क आहे, असे सांगत आम्ही प्रबळ विरोधी पक्ष असू, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा युतीचे सरकार स्थापन होईल, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, भाजपला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. त्याचवेळी शिवसेनेने सत्तेत ५०-५० जागांची मागणी केली आहे. त्यावर शिवसेना अडून आहे. त्यामुळे सत्ता स्थापन होण्यास उशिर होण्याचे संकेत मिळत आहे. त्यावेळी राष्ट्रवादीत विरोधी पक्षनेते पदासाठी चुरस निर्माण झाली आहे.


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि शरद पवारांचे जवळचे आणि आक्रमक नेते जितेंद्र आव्हाड यांचेही नाव चर्चेत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोणाच्या नावाला पसंती देतात याकडे लक्ष लागले आहे.