मुंबई काँग्रेस कार्यकारी अध्यक्षपदी एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती
मुंबई काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबई काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत काँग्रेसने युवा चेहरा न देता ज्येष्ठ असलेल्या चेहऱ्याला प्राधान्य दिले आहे. दरम्यान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही राजीनामा दिला होता. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता होती. मात्र, काँग्रेसने ज्येष्ठ नेत्याला प्राधान्य दिले आहे.
काँग्रेसचा लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत दारुण पराभव झाला. या पराभवाची कोणीही जबाबदारी स्विकारली नाही. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी तीव्र नाराज होते. त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर तशी नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर अनेक नेत्यांनी राजीनामे देण्याचा सपाटा लावला. यात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही राजीनामा दिला होता. त्यामुळे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष पद रिक्त होते.
काँग्रेसने आगामी विधानसभेच्या तोंडावर एकनाथ गायकवाड यांची वर्णी लागली आहे. दरम्यान, मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिल्यानंतर तीन कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात यावेत, अशी मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली. अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली. थोरात यांच्या मदतीला पाच कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले.