मुंबई: चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदरात ऐतिहासिक घसरण झाल्यानंतर विरोधकांकडून मोदी सरकारला लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी सध्या सोशल मीडियावर गाजत असलेल्या 'रसोडे मे कौन था?' या ओळींचा वापर करत पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. 'जब जीडीपी डुबा, तब रसोडे मे कौन था... मोदीजी थे' असे खोचक ट्विट सावंत यांनी केले. त्यामुळे आता भाजपकडून या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधींचा 'तो' इशारा खरा ठरला; जीडीपीची ऐतिहासिक घसरण

एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराने उणे २३.९ टक्के ऐतिहासिक निचांकी पातळी गाठली. ४० वर्षांत पहिल्यांदाच जीडीपीमध्ये इतकी मोठी घसरण झाली आहे. अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रांची तुलना करायची झाल्यास बांधकाम, उत्पादन आणि खाणकाम क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे.



यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही मंगळवारी भाजपला लक्ष्य केले होते. सहा महिन्यांपूर्वी राहुल गांधी यांनी आर्थिक त्सुनामीबाबत इशारा दिला होता. कोरोना संकटावेळी सरकारकडून हस्तीदंती पॅकेजची घोषणा झाली. मात्र, आजची परिस्थिती पाहा, विकासदर उणे २३.९ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. भाजप सरकारने देशाची अर्थव्यवस्था बुडवली, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली होती.