मुंबई : तेलंगणातील भारत राष्ट्र समिती (BRS) ही भाजपची (BJP) 'बी' टीम असून महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. मतविभाजनामुळे कोणाला फायदा होतो हे राज्यातील जनतेला माहित आहे. तेलंगाणात बीआरएस पक्षाला मोठे खिंडार पडलं असून त्यांचे अनेक नेते काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करत आहेत. तेलंगणा पॅटर्न (Tengana Pattern) हा गुजरात पॅटर्नसारखाच (Gujrat Pattern) फसवा आहे. तेलंगणात केसीआर यांच्या पक्षाने काय केले याची सर्व माहिती काँग्रेसकडे आहे लवकर या फसव्या तेलंगणा पॅटर्नची पोलखोल करु, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेलंगणातील भारत राष्ट्र समिती महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही असं पटोले यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात काँग्रेस विचाराचेच सरकार यावं ही वारकरी तसंच जनतेची अपेक्षा आहे आणि महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल. केसीआर यांनी 9 वर्षात तेलंगणात कोणतेही काम केलेलं नाही. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, मागासवर्गीयांसाठी त्यांनी ठोस असं काहीही केलेलं नाही. आताही कांद्याला तेलंगणात जास्त भाव असल्याचं सांगितलं जात होतं. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तेलंगणात कांदा विक्रीस नेला असता त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. केसीआर सरकार फक्त मोठ-मोठ्या जाहीराती देऊन काम केल्याचा डांगोरा पिटत आहे. जो काम करतो त्याला जाहीरातबाजी करण्याची आवश्यकता भासत नाही असं पटोले यांन सांगितलं.


पंढरपूरमध्ये आषाढीवारी होत आहे. या वारीत हैदराबादहून तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर 600 गाड्यांचा ताफा घेऊन येत असल्याची माहिती समजते. पंढरपुरात आषाढी वारीला 10 लाख वारकरी जमतात, त्यात केसीआर यांनी बाहेरुन आणखी लोक आणून गर्दी करायची हे बरोबर आहे का? पंढरपूरचा विठोबा हा श्रद्धेचा, आस्थेचा विषय आहे, त्याचा कोणी राजकीय फायदा उठवत असेल तर योग्य नाही अशी टीकाही पटोले यांनी केली.


'आणीबाणीवर बोलण्याचा भाजपाला अधिकार नाही..'
दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी कोणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू केली होती याचा भाजपाने निट अभ्यास करायला पाहिजे. भाजपाला इतिहासच नाही त्यावर ते काय बोलणार? 1975 मध्ये अमेरिका-व्हिएतनाम युद्ध सूरू होते आणि त्याच वेळी देशामधील लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी काही लोकांनी षडयंत्र रचलं होतं, काही लोक जाणीवपूर्वक चिथावणी देत होते. इंदिराजींनी आणीबाणी लावली नसती तर देशात लोकशाही राहिली नसती. इंदिराजी गांधी यांनी 18 महिन्यानंतर आणीबाणी उठवली व निवडणुकाही घेतल्या. इंदिराजी गांधी लोकशाहीच्या पाईक होत्या म्हणून लोकशाही वाचली. 


काँग्रेस पक्षाने आणीबाणीबद्दल नंतर माफीही मागितली आहे. पण आता देशात काय चालले आहे? आणीबाणीपेक्षाही भयानक परिस्थिती आहे. लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून कारभार सुरु आहे. 9 वर्षापासून देशात अघोषीत आणीबाणी सुरू आहे, त्यावर भाजपाने आधी बोलले पाहिजे. मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जाते, सरकारी तपास यंत्रणाचा वारेमाप गैरवापर सुरु आहे, विरोधकांची दडपशाही सुरु असून सरकारविरोधात बोलणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. आणीबाणीच्या नावाखाली भाजपा तरूणांना भडकवत आहे ते त्यांनी थांबवावे. भाजपाला आणीबाणीवर बोलण्याचा अधिकार नाही, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.


पहिल्याच पावसात मुंबईत पाण्यात मग कोट्यवधी रुपये गेले कुठे?
राज्यातील शिंदे-फडणीस सरकार हे घोषणाबाज आणि जाहीरातबाज सरकार आहे. काम काहीच करत नाही फक्त गाजावाजा करत असतात. पहिल्याच पावसाने या सरकारच्या दाव्यांची पोलखोल केली. मुंबईत जागोजागी पाणी साचून मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले, 6 मुंबईकरांना हकनाक जीव गमवावा लागला. मुंबईत जागोजागी खड्डे खणून ठेवले आहेत. नालेसफाईसह मुंबईच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केले पण मुंबई पाण्यात गेलीच, मग खर्च केलेला पैसा गेला कुठे? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला आहे.