आम्हीही सर्जिकल स्ट्राईक केले पण जाहिरात नाही केली - सुशीलकुमार शिंदे
सुशील कुमार शिंदे यांनी झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.
मुंबई : आमच्या काळात आम्हीही सर्जिकल स्ट्राईक केले. मी गृहमंत्री असताना आमच्या सरकारने दहशतवाद्यांचे ६५ कॅम्प ४० वर आणले. मात्री आम्ही त्याची जाहिरात केली नाही असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे. झी २४ तासचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांनी शिंदे यांची विशेष मुलाखत घेतली. त्यात त्यांनी विविध विषयांबाबत मनमोकळा संवाद साधला. हिंदू दहशतवादी असं आपण कधीही म्हणालो नाही असं शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं की, 'सर्जिकल स्ट्राईक जाहीर करायचे नसतात. आम्ही ऐवढे केले स्ट्राईक. ६२ कॅम्प आम्ही ४० वर आणले. याची वाच्यता आम्ही केली नाही. या गोष्टी सारख्या सांगायच्या नसतात. पण या सरकारला या गोष्टीचं मार्केटिंग करण्याची सवय आहे. बालाघाटमध्ये झालेल्या स्ट्राईकची इतकी चर्चा झाली. वेगवेगळे आकडे सगळे सांगत होते.'
हिंदू दहशतवादावर स्पष्टीकरण
'कोणत्याही धर्माला आपण दहशतवादी म्हणू शकत नाही. दहशतवाद्याला जात, धर्म नसतो. माझ्या पक्षाच्या मिटींगमध्ये मी बोललो. पक्षाच्या मिटींगमध्ये वस्तूस्थिती मांडणे हे माझं कर्तव्य आहे. त्यावेळी मी हे बोललो होतो. हिंदुत्वावर राजकारण करण्याचा भाजपचा धंदा झाला आहे.' असं देखील सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.