मुंबई: काँग्रेस पक्ष हा सावरकरांच्या विरोधात नाही. फक्त आमचा त्यांचा हिंदुत्ववादी विचारसरणीला विरोध असल्याचे वक्तव्य माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले. ते गुरुवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, इंदिरा गांधी पंतप्रधान असताना काँग्रेस सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे टपाल तिकीट काढले होते. काँग्रेस पक्ष सावकरांच्या विरोधात नाही. मात्र, सावरकरांची हिंदुत्ववादी विचारसरणी काँग्रेसला मान्य नसल्याचे डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच भाजपने विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन भाजपतर्फे देण्यात आले होते. 


'महाराष्ट्रातील प्रत्येक तिसरा तरुण बेरोजगार; भाजपचे विकासाचे मॉडेल फेल'


यानंतर काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. सावकरांना भारतरत्न देणार असाल तर नथुराम गोडसेला ही भारतरत्न मिळणार, असा खोचक टोला त्यांनी सरकारला लगावला होता.


या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांनी म्हटले की, भारतरत्न देण्यासाठी एक समिती नेमली जाते. ही समितीच भारतरत्न पुरस्कार कोणाला द्यायचा, हा निर्णय घेते. तसेच काँग्रेसला देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले. काँग्रेसपेक्षा जास्त देशभक्त कुणीही नाही. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नावदेखील नसल्याचे त्यांनी सांगितले. 


या पत्रकारपरिषेदत मनमोहन सिंग महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. भाजपकडून मोठा गाजावाजा करण्यात आलेले विकासाचे डबल इंजिन मॉडेल महाराष्ट्रात सपशेल अपयशी ठरले आहे. जागतिक मंदीमुळे महाराष्ट्र अनेक गंभीर समस्यांना तोंड देत आहे. एकेकाळी गुंतवणूक आकर्षित करण्यात पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आजघडीला देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणारे राज्य झाले आहे, अशी टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली.