मोदी लाटेत गड राखणाऱ्या अशोक चव्हाणांना लोकसभेची उमेदवारी नाही?
नांदेड मतदारसंघातून अशोक चव्हाण यांनी विजय मिळवून काँग्रेसची लाज राखली होती.
मुंबई: काँग्रेस पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभरात मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. यादृष्टीने विविध लोकसभा मतदारसंघातील इच्छूक नेते पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेत आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यभरात नांदेड आणि हिंगोली या दोन मतदारसंघांमध्येच विजय मिळवता आला होता. यापैकी नांदेड मतदारसंघातून अशोक चव्हाण यांनी विजय मिळवून काँग्रेसची लाज राखली होती. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांसाठी हा मतदारसंघ जवळपास निश्चित मानला जात होता.
मात्र, अशोक चव्हाण यांनीच आपण यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. त्यांच्याऐवजी नांदेडमधून त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण लोकसभेसाठी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढतील अशी चर्चा आहे.
अशोक चव्हाण विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तांतर झाल्यास अशोक चव्हाण मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील. त्यामुळे चव्हाणांनी लोकसभा न लढण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
राज्यात जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे राज्यात २०१९ ची निवडणूक अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे.