संजय राठोड यांनी कोराना काळात केलेल्या शक्ती प्रदर्शनावर काँग्रेसही नाराज
शरद पवारांपाठोपाठ थोरातांनी देखील व्यक्त केली नाराजी
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : संजय राठोड (Sanjay Rathod) हे नाव गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहे. अगोदर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण (Pooja Chavan Suicide Case) आणि आता कोरोना काळात पोहरादेवी मंदिरावर केलेलं शक्तीप्रदर्शन. पोहरादेवी मंदिरात समर्थकांनी केलेल्या या शक्तीप्रदर्शनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat angry on Sanjay Rathod ) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात संजय राठोड यांनी गर्दी जमवणं बरोबर नाही, असं देखील थोरात म्हणाले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी लवकर करून विषय संपवायला हवा, असं देखील थोरात यावेळी म्हणाले.
संजय राठोड यांना पोहरादेवी इथलं शक्तिप्रदर्शन भोवण्याची चिन्हं आहेत. संजय राठोड यांचं मंत्रिपद धोक्यात आलंय, अशी सूत्रांची माहिती आहे. संजय राठोड प्रकरणी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. राठोड यांनी गर्दी जमवून केलेल्या शक्तिप्रदर्शनावरही शरद पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. राठोड यांच्या प्रकरणामुळे आणि त्यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे महाविकास आघाडीची प्रतिमा मलीन होत असल्याचं चित्र दिसून येतं आहे. मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवी गर्दीप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे शरद पवारांनीही नाराजी व्यक्त केल्याने राठोड यांचं मंत्रिपज धोक्यात आलं आहे.
संजय राठोड कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज सकाळी ते त्यांच्या यवतमाळमधील निवासस्थानावरून मुंबईकडे रवाना झालेत. ३ फेब्रुवारीपासून मंत्रालय आणि शासकीय कामकाजापासून राठोड दूर होते. या काळात त्यांनी मंत्रिमंडळाच्या 2 बैठकांना दांडीही मारली. आता आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला ते हजर राहणार आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राठोड प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.