दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : भाजपच्या वाटेवर असलेले काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर आणि राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांचा अखेर येत्या मंगळवारी 30 जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईतील चर्चगेट येथील गरवारे क्लबवर हा प्रवेश होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोळंबकर मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. यापूर्वीच त्यांनी भाजपात प्रवेश करण्याबाबत घोषणा केली होती, तर त्यांच्या संपर्क कार्यालयावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावले होते. शिवसेना सोडून 2005 साली कोळंबकरांनी नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता काँग्रेसला रामराम करून कोळंबकर भाजपात जात आहेत. 


राष्ट्रवादीचे नगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघातील आमदार वैभव पिचड यांचाही मंगळवारी भाजपात प्रवेश करणार आहेत. पिचड यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. वैभव यांचे वडील मधुकर पिचड हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते तर त्यांनी राज्यात अनेक महत्त्वाची मंत्रीपदे भूषवली आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पिचड घराणे शरद पवार आणि राष्ट्रवादीशी एकनिष्ठ होते.