नाराज असलेले काँग्रेस नेते आज करणार मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
अखेर आज मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्यांची बैठक होणार..
दीपक भातुसे, मुंबई : अखेर आज दुपारी १.३० वाजता काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यांच्यात बैठक होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. काँग्रेसच्या नाराजीवर ही चर्चा होणार आहे. निर्णय प्रक्रियेत सहभाग, विधानपरिषदेच्या १२ जागांचे समान वाटप, विकास निधीचे समान वाटप यावर चर्चा होणार आहे. छत्तीसगडमध्ये लागू करण्यात आलेली गरीबांच्या खात्यात थेट ५ ते ७५०० हजार रुपये जमा करणारी गरीब न्याय योजना महाराष्ट्रात लागू करण्याबाबतही मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होणार आहे.
नाराजीचे विषय वाढत गेल्याने महाविकास आघाडीतील दरीही वाढत गेली. ही दरी मिटवण्यासाठी आणि काँग्रेसची नाराजी मुख्यमंत्र्यांनी दूर करावी म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे भेटीही वेळ मागितली होती.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत काँग्रेसच्या नाराजीचे मुद्दे दूर झाल्यास महाविकासआघाडी सरकारमधील नाराजी नाट्य संपुष्टात येईल. मात्र ही नाराजी दूर झाली नाही तर त्याचा परिणाम सरकारवरही होऊ शकतो. त्यामुळे आजच्या बैठकीत काँग्रेसची नाराजी दूर होते का यावर लक्ष असेल.
काय आहेत काँग्रेसच्या तक्रारी?
- कोरोनाच्या काळात काँग्रेसचे मंत्री पालकमंत्री या नात्याने आपल्या जिल्ह्यात असताना त्यांना विश्वासात न घेता त्यांच्या जिल्ह्यात आणि खात्यात परस्पर निर्णय घेण्यात आले
- यासंदर्भात विदर्भातील मंत्र्यांनी लॉकडाऊनच्या काळात मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली
- सरकारच्या निर्णय प्रक्रियेत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा
- सरकारमध्ये असूनही काँग्रेसला निर्णय प्रक्रियेत विशेष स्थान नसल्याची भावना
- लॉकडाऊनच्या काळात गरीबांच्या खात्यात थेट 5 ते 7500 रुपये देणारी न्याय योजना राज्यात लागू करण्याचा काँग्रेसचा आग्रह
- छत्तीसगड सरकारने अशी योजना लागू केली असून त्याबाबत काँग्रेसने राज्याच्या मंत्रीमंडळात प्रस्ताव मांडला होता, पण त्यावर चर्चाच झाली नाही
- विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांचे तीन पक्षात समान वाटप व्हावे, त्यात काँग्रेसला 4 जागा मिळाव्यात
- विविध विभागांकडून वितरित होणाऱ्या विकास निधीचे समसमान वाटप झालं नाही.
- अशोक चव्हाण यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम खात्याचे विभाजन करून पायाभूत सुविधा अशा नवीन खात्याची निर्मिती होणार आहे. त्या खात्यात अशोक चव्हाण यांच्या खात्यातील अनेक उपविभाग हस्तांतरित होणार आहेत. मात्र या निर्णयाबद्दल अशोक चव्हाण यांना कल्पनाच नव्हती, त्यांच्याशी चर्चा न करताच हा निर्णय घेण्यात आला होता. ही काँग्रेसच्या नाराजीची प्रमुख कारणं आहेत.