काँग्रेस आमदार अस्लम शेख लवकरच बांधणार शिवबंधन?
आमदार अस्लम शेख गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा रंगत आहेत.
गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना मोठे धक्के बसले आहेत. मालाड विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस आमदार अस्लम शेख गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा रंगत आहेत. आचारसंहिता काही दिवसांवर असताना त्यांच्या कडून विभागात विकासकामांच्या उद्धाटनाचे सत्र सुरू झाले आहे.
दरम्यान, काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्या पोस्टरवर काँग्रेस पक्षाचे नाव नसल्यामुळे ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित पक्षप्रवेश करणार या चर्चाला आणखी उधाण आले आहे.
आमदार अस्लम शेख हे १९९९ ते २००४ समाजवादी पार्टी व २००४ ते २००९ या काळात काँगेसचे नगरसेवक होते. तसेच २००९ आणि २०१४ मध्ये ते मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते.