काँग्रेसवर नामुष्की, आमदारांची मत फुटल्यावरही कारवाई नाही?
विधान परिषद पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणं प्रसाद लाड विजयी झालेत.
दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : विधान परिषद पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणं प्रसाद लाड विजयी झालेत. भाजपच्या प्रसाद लाड यांना २०९ मतं मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे दिलीप माने यांना केवळ ७३ मतांवर समाधान मानावं लागलं.
सत्ताधाऱ्यांकडे भाजपाची १२२, शिवसेनेची ६२, बहुजन विकास आघाडी ३ आणि अपक्ष ७ अशी १९४ मतं होती. म्हणजेच भाजपा उमेदवाराला १५ अधिक मतं मिळाली. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपाला २०८ मते मिळाली होती. यावेळी भाजपाने एक मत जास्त मिळाले.
विरोधकांकडे कांग्रेस ४२, राष्ट्रवादी ४०, शेकाप ३, समाजवादी पक्ष १, माकप १, भारिप १ अशी ८८ मते होती. तरी दिलीप माने यांना ७३ मते मिळाली. म्हणजेच १५ मते कमी मिळाली.
या निवडणुकीत काँग्रेस आमदार नितेश राणे आणि कालीदास कोळंबकर यांनी प्रसाद लाड यांना मतदान केल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाचा आदेश झुगारुन लावला आहे. पण असं असलं तरी काँग्रेस या आमदारांवर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या आमदारांवर काँग्रेसनं कारवाई केली तर विधानसभेमधलं काँग्रेस आमदारांचं बळ आणखी खाली जाईल. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसला विधानसभेतलं विरोधी पक्षनेतेपद गमावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे काँग्रेस हे पाऊल उचलण्याचं धाडस करणार हाच खरा प्रश्न आहे.