काँग्रेसचे आमदार रात्री मुंबईत परतण्याची शक्यता; राजकीय वाटाघाटींना वेग
काँग्रेस-शिवसेनेतील वाटाघाटींना वेग
मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी विचारणा केल्यानंतर राज्यातील हालचालींना कमालीचा वेग आला आहे. बहुमतासाठी लागणारे संख्याबळ राज्यपालांसमोर सादर करण्यासाठी शिवसेनेच्या हातात अवघे काही तास आहेत. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील वाटाघाटींना वेग आला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत सोमवारी सकाळीच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी रवाना होणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. यानंतर आता जयपूरच्या रिसॉर्टमध्ये वास्तव्याला असणारे काँग्रेस आमदारही मुंबईत परतणार आहेत. काहीवेळापूर्वीच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेस आमदारांना ठेवण्यात आलेल्या रिसॉर्टमध्ये पोहोचले आहेत. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर काँग्रेसचे नेते आज रात्रीच मुंबईत परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी सकारात्मक असल्याचे चित्र दिसत आहे.
शिवसेना 'एनडीए'तून बाहेर पडणार; अरविंद सावंत राजीनामा देण्याच्या तयारीत
मात्र, सोनिया गांधी आणि संजय राऊत यांच्या दिल्लीतील भेटीनंतरच याविषयीचे नेमके चित्र स्पष्ट होऊ शकेल. या भेटीनंतर शिवसेना एनडीएतून बाहेर पडेल, असेही सांगितले जात आहे.
मोठी बातमी: राज्यपालांकडून सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला विचारणा
त्यासाठी शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. अरविंद सावंत हे सध्या अवजड उद्योग खात्याचे कॅबिनेट मंत्री आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणत्याही क्षणी त्यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला जाऊ शकतो.
तत्पूर्वी भाजपने आज राज्यपालांना भेटून आम्ही सरकार स्थापन करणार नसल्याची माहिती दिली. या निर्णयाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली होती. भाजप, शिवसेना, रिपाई, रासप आणि रयत क्रांती अशा महायुतीने एकत्र विधानसभा निवडणूक लढवली होती. जनतेने महायुतीला भरघोस जनादेशही दिला होता.
मात्र, शिवसेनेने जनमताचा अनादर करत सरकार स्थापन करण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपने सरकार न स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून सरकार स्थापन करायचे असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.