काँग्रेस-राष्ट्रवादीत या ७ जागांवरुन रस्सीखेच
महाआघाडीच्या जागावाटपाचा तिढा कायम
दीपक भातुसे, मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जागा वाटपाचं घोडं काही जागांवर अडलं असून या जागांच्या वाटपाबाबत आता दिल्लीतच निर्णय होईल असं सांगितलं जातं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी देशपातळीवर महाआघाडी उभारण्याचे विरोधकांचे प्रयत्न आहेत. त्यासाठी प्रत्येक राज्यात भाजपविरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडीचे प्रमुख घटकपक्ष आहेत. त्याचबरोबर इतर लहान पक्षही या महाआघाडीत सहभागी होत आहेत. मात्र अनेक बैठकानंतरही राज्यातील या महाआघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मित्र पक्षांच्या जागा वगळता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही जागांचे वाटप अद्याप शिल्लक असून आता त्याचा निर्णय दिल्लीतच होईल असं सांगितलं जातं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ४० जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चर्चा पूर्ण झाली आहे. उरलेल्या जागांपैकी काही जागांच्या अदलाबदलीवर चर्चेचं घोडं अडलं आहे.
१. पुणे - पुण्याची जागा काँग्रेसकडे असून ती राष्ट्रवादीला हवी आहे. या जागेवरील हट्ट राष्ट्रवादीने सोडल्याची चर्चा होती. मात्र तसे काहीही झाले नसल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय.
२. अहमदनगर - राष्ट्रवादीकडे असलेली अहमदनगरची जागा काँग्रेसला हवी आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखेंना इथून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे.
३. रत्नागिरी-सिंधुदुर्ग - काँग्रेसकडे असलेला रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदारसंघ राष्ट्रवादीला हवा आहे. काँग्रेस सोडून गेलेल्या कोकणातील एका बड्या नेत्यासाठी राष्ट्रवादीला ही जागा हवी आहे.
४. नंदूरबार - हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे. पण भाजपच्या एका विद्यमान खासदारासाठी राष्ट्रवादीने या जागेवर दावा ठोकला आहे
५. यवतमाळ - काँग्रेसकडे असलेला यवतमाळ हा मतदारसंघ राष्ट्रवादीला हवा आहे. हा मतदारसंघ मिळाला तर आपल्याकडे तगडा उमेदवार असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. मात्र काँग्रेसचे माणिकराव ठाकरे इथून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहे
६. औरंगाबाद - काँग्रेसकडे असलेला औरंगाबाद मतदारसंघही राष्ट्रवादीला सतिश चव्हाण यांच्यासाठी हवा आहे.
७. रावेर - राष्ट्रवादीकडे असलेला रावेर हा मतदारसंघ काँग्रेसला हवा आहे.
दोन्ही काँग्रेसमधील जागा वाटप या जागांवर अडले आहे. तर दुसरीकडे मित्रपक्षांसाठी कोणत्या जागा सोडायच्या हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निश्चित केले आहे. त्यानुसार राजू शेट्टी यांच्यासाठी हातकणंगलेची जागा सोडण्यात आली आहे. तर पालघरची जागा बहुजन विकास आघाडीसाठी सोडण्याची तयारी आहे. अकोल्याची जागा भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी ठेवण्याची आघाडीची तयारी आहे. तर अमरावतीची जागा राजेंद्र गवई यांच्यासाठी सोडली जाऊ शकते.
केंद्रातील भाजप सरकारला हरवण्यासाठी राज्यातील लोकसभेची एक-एक जागा जिंकणं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळेच ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो ती जागा त्या पक्षाला सोडण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी केला होता. मात्र तरीही दोन्ही पक्षात जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असून आता हा तिढा दिल्लीतच सुटणार आहे.