मुंबई : राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीबाबत उद्या साडे पाच वाजता काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. लवकरच जागावाटपाचा प्रश्न मार्गी लागेल. घटक पक्षांशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. राज्यात सर्व छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांच्या महाआघाडीला अंतिम रूप देण्याचा शेवटचा टप्पा असणार आहे. समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीतील उरलेल्या ८ जागांबाबत चर्चा आता राज्यस्तरावरच होणार आहे. यासाठी उद्या संध्याकाळी काँग्रेस राष्ट्रवादीची महत्वाची बैठक असेल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाघडीला अंतिम रूप देण्याचा अंतिम प्रयत्न सुरू आहे. यामुळे दोन्ही पक्षांत मागील काही दिवसांपासून ज्या ८ जागांबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात चर्चा होणार होती, मात्र, पवार - राहुल गांधी यांनी हा प्रश्न राज्यातच सोडवा असे सांगितल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ही चर्चा आता राज्यस्तरावरच करण्याचे दोन्हीही नेत्यांनी निर्णय घेतला आहे. यामुळे उद्याच्या बैठकीत उरलेल्या ८ जागांबाबत निर्णय होणार आहे.


दरम्यान, अहमदनगरमधील नगरसेवकांना नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडून लेखी उत्तर आल्यानंतर लवकरच निर्णय घेण्यात येईल. उत्तर देण्याच्या वेळेत कोणतीही मुदत वाढ करण्यात आली नाही अथवा मुदत वाढ करण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्ट केले. दरम्यान, नगरसवेकांनी उत्तर देण्यास मुदतवाढ मागितली होती.