मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अजून संपलेला नाही. राज्यात सत्ता स्थापनेच्या दृष्टीने शिवमहाआघाडीची तयारी सुरु आहे. या आघाडीची पहिली बैठक झाली. त्यामुळे राज्यात पहिले पाऊल पुढे पडले आहे. याबैठकीनंतर राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी अत्यंत महत्वाची असलेली काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नियोजित बैठक रद्द झाली आहे. दोन्ही नेते रविवारी भेटणार होते. ही भेट पुढे ढकलण्यात आली असून ती सोमवारी होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप आणि शिवसेनेत दुरावा निर्माण झाल्यानंतर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे नवे समीकरण पुढे आले आहे. आता त्याच्या पुढचे पाऊल म्हणून सरकार स्थापनेसाठी शिवसेनेबरोबर आघाडी करण्याच्या मुद्दावर चर्चा करण्यासाठी दोन्ही नेते भेटणार होते. राज्यात नव्याने आकाराला येणाऱ्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाशिवआघाडीने किमान समान कार्यक्रमही निश्चित केला आहे.


दमम्यान, राष्ट्रवादीने रविवारी पुण्यात आपल्या आमदारांची बैठक बोलवली आहे. सोनिया गांधी, शरद पवार भेटी किमान समान कार्यक्रम आणि तिन्ही पक्षांमध्ये होणाऱ्या खातेवाटपावर चर्चा होणार असल्याचे बोलले जात होते.  



१२ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू आहे. महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष असून त्यांच्याकडे १०५ आमदार आहेत. पण भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी म्हणून महाशिवआघाडी उदयाला आली आहे. शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीकडे ५४ तर काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत.