मुंबई: घाटकोपरच्या असल्फा परिसरात रविवारी रात्री काँग्रेसचे कार्यकर्ता मनोज दुबे यांची तलवारीने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्टमुळे निर्माण झालेल्या वादातून दुबे यांची हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल रात्री अडीचच्या सुमारास असल्फा मेट्रो स्थानकाच्या परिसरात सुमारास दुबे यांच्यावर काही जणांनी तलवार आणि चाकूने हल्ला केला. यामध्ये दुबे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ नजीकच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे स्थानिक आमदार नसीम खान यांच्याविरुद्ध भाजपशी संबंधित एका तरुणाने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. मनोज दुबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या पोस्टवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर हा वाद आणखीनच चिघळत गेला. याचा राग मनात ठेवून भाजपच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री दुबे यांना असल्फा मेट्रो रेल्वे स्थानकाजवळ गाठले आणि त्यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुबे यांच्यावर थेट तलवार आणि चाकूने हल्ला चढवत त्यांची हत्या केली. 


पोलिसांनी याप्रकरणी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी सुनील दुबे, उमेश सिंह, आकाश शर्मा यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.