मुंबई : कधीकाळी भारतातील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत आता कोरोनाची दुसरी लाट (Mumbai corona second wave) येतेय का अशी भीती व्यक्त होत आहे. कारण मुंबईत आज नव्या रुग्णांची संख्या ही तब्बल १ हजार ९६२ आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलग चौथ्या दिवशी मुंबईतील नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. नव्या वर्षात मुंबईत नवीन कोरोनाग्रस्तांनी एवढी मोठी संख्या गाठली नव्हती. आश्चर्य म्हणजे मुंबईतील कोरोनाचा (Mumbai corona positivity rate) पॉझिटीव्हीटी रेटही वाढू लागला आहे. ६ टक्क्यांवर असलेला कोरोना पॉझिटीव्हीटी रेट आता ९ टक्क्यांवर गेला आहे.


मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय


दिवस                            नव्या रुग्णांची संख्या


११ मार्च                             १ हजार ५०८


१२ मार्च                             १ हजार ६४६


१३ मार्च                             १ हजार ७०८


१४ मार्च                             १ हजार ९६२


 


याशिवाय मुंबईतील कोरोना रुग्णांच्या दुपटीचं (Mumbai corona doubling rate) प्रमाणही घसरून १७६ दिवसांवर गेलं आहे. तर रिकव्हरी रेटही (Mumbai corona recovery rate) घसरला आहे. मुंबईत कोरोनातून बरे होण्याचं प्रमाण ९२ टक्क्यांवर आलं आहे.


मुंबईत निर्बंधांमध्ये शिथिलता दिल्यापासून अनेक ठिकाणी कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन होताना दिसतं. मुंबई लोकल (Mumbai local) आणि मार्केटमध्ये अनेक जण सोशल डिस्टन्स आणि मास्कचं पालन करताना दिसत नाहीत. शिवाय हॉटेल, पबही सुरू झाले आहेत, तिथेही होणारी गर्दी पाहता मुंबईकरांना कोरोनाचा विसर पडलाय का? असा प्रश्न पडतो.


दुसरीकडे महाराष्ट्रातही आज १६ हजाराहून नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे, तर ५० कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला आहे.


दरम्यान मुंबईत इतक्यात तरी लॉकडाऊन लागणार नाही, मात्र संचारबंदी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मुंबईत सध्या अक्टीव्ह रुणांची संख्या १३ हजार ९४० वर पोहोचली आहे.