नवी मुंबई: सायन आणि केईएम रुग्णालयातील गलथान कारभाराच्या घटना ताज्या असतानाच आता नवी मुंबईतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील वाशी मनपा रुग्णालयातून एक मृतदेहच गायब झाल्याने मोठी खळबळ उडाली. मोहम्मद उमर फारुख शेख असे या मृत व्यक्तीचे नाव असून ९ मे रोजी त्याचा मृत्यू झाला होता. मात्र, कोरोना चाचणीचे अहवाल यायचे असल्याने त्याचा मृतदेह वाशी मनपा रुग्णालयात ठेवण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायन रुग्णालयात मृतदेहांशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार; किरीट सोमय्यांची ICMRकडे तक्रार


अखेर आज या व्यक्तीच्या कोरोना चाचणीचा अहवाल आला. यामध्ये संबंधित व्यक्ती कोरोना नेगेटिव्ह आढळून आली. त्यामुळे व्यक्तीचे कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेण्यासाठी वाशी मनपा रुग्णालयात गेले. त्यावेळी मोहम्मद उमर फारुख शेख यांचा मृतदेह रुग्णालयातून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बराच शोध घेऊनही त्यांचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळे मोहम्मद उमर फारुख शेख यांच्या कुटुंबीयांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या या पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. 


धक्कादायक ! केईएम रुग्णालयातही मृतदेहाशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार


दरम्यान, नवी मुंबईत रविवारी कोरोनाचे ६२ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ११९० इतकी झाली आहे. तर आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. तुर्भे परिसरात सर्वाधिक २३ रुग्ण आढळून आले. तर कोपरखैरणे परिसरात २० नव्या रुग्णांची नोंद झाली. याशिवाय, घणसोली-४, ऐरोली ५, नेरूळ ४, वाशी ४, घणसोली ४  तर बेलापूर आणि दिघ्यात प्रत्येकी एक नवा रुग्ण सापडला आहे.