दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटात औषधांचा काळा बाजार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. कोरोनासाठीची औषधं दुप्पट आणि तिप्पट किंमतीला विकली जात आहेत. रेमेडिसीवर आणि टॉसिलीझुलाब या औषधांचा काळा बाजार रोखण्यासाठी मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात बैठक पार पडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविडवरील उपचारासाठी वापरण्यात येणार्‍या इंजेक्शन्सचा काळाबाजार केला तर कडक कारवाई होणार आहे. अशाप्रकारे औषधांचा काळा बाजार आढळून आला तर पोलीस आणि एफडीए संयुक्त कारवाई करणार आहे. औषधांचा काळाबाजार होत असल्याचं आढळल्यास टोल फ्री क्रमांक - 1800222365 तक्रार करता येईल.


मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, राज्याचे पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलिस आयुक्त आणि दोन्ही खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 


कोरोनाच्या उपचारात फायदेशीर ठरणाऱ्या रेमेडिसीवर आणि टॉसिलीझुलाब या इन्जेक्शनचा पुरवठा कमी आहे, त्यामुळे विक्रेते याचा काळाबाजार करत आहेत. आधीच महाग असलेली ही इंजेक्शन विक्रेते दुप्पट, तिप्पट किंमत घेऊन विकत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यानंतर राजेंद्र शिंगणे यांनी काही मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन याबाबत पाहणीही केली.