मुंबई : सध्या राज्यात कोरोनाने (Coronavirus) हातपाय पसरण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधताना काळजीसह खबरदारी घेण्याचे आवाहन केले. तुम्हाला पुन्हा लॉकडाऊन हवा आहे का, असा थेट सवाल केला. आठ दिवसांनंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असे संकेत दिले आहेत. त्यानंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी रुग्णालयातून जनतेला पत्र लिहून आवाहन केले आहे. (Rajesh Tope's emotional letter) टोपे यांना कोरोनाची बाधा झाल्याने ते सध्या उपचार घेत आहेत. मात्र, असे असताना वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेऊन त्यांनी रुग्णालयातूनच पत्र लिहिले आहे. त्यांनी हे पत्र ट्विट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजेश टोपे यांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली आहे. टोपे यांनी जनतेला उद्देशून पत्र लिहिले असून कळकळीचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरुद्धची लढाई लढत आहोत. सरकारची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना आणि प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक कोरोना योध्ये विशेषतः डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करु शकलो, असे पत्रात राजेश टोपे यांनी कोरोना योध्यांचे कौतुक केले आहे.


'अखेर कोरोनाने मला गाठलेच'


 कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. त्यामुळे जनतेने काळजी घेतली पाहिजे. जबाबदारीने कोविड-१९चे नियम पाळा. अद्याप कोरोना गेलेला नाही. तो पुन्हा डोकं वर काढत आहे. तेव्हा पुन्हा एकदा सामूहिक लढाई लढावी लागणार आहे. मी सध्या रुग्णालयात कोरोनाविरुद्ध लढा देत आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणू माझा पाठलाग करत होता. मी राज्यातील अनेक भागात गेलो, कोरोना हॉटस्पॉटला भेटी दिल्या, परंतु कोरोनाला माझ्या जवळ येणे जमले नाही, पण अखेर त्याने मला गाठलेच. मात्र, आपल्या सदभावना, प्रेम यामुळे त्याला हरवून पुन्हा एकदा कोरोना विरुध्दच्या सामूहिक लढाईत सहभागी होणार आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.


पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही !


आपण जमजूदार आहात. संवेदनशिल आणि सहकार्य करणारी जनता ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे . म्हणूनच लॉकडाऊन काळात सर्व जनतेने कोरोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिला. मात्र आता पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. लॉकडाऊन टाळणे केवळ आणि केवळ आपल्याच हातात आहे. तेव्हा आपणास माझे कळकळीचे आवाहन आहे, मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा आणि लॉकडाऊन टाळा, असे भावनिक आवाहन यावेळी राजेश टोपे केले आहे.