पंधरा दिवस उलटूनही केईएमला आयसोलेशन वॉर्डची प्रतिक्षाच
पंधरा दिवस उलटूनही आयसोलेशन वॉर्ड तयार नाही
मुंबई : पंधरा दिवसांमध्ये राज्यातील महत्वाच्या रुग्णालयांत आयसोलेशन वॉर्डची स्थापना केली जाईल असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. पण मुंबई महापालिकेच्या सर्वात मोठ्या केईएम रुग्णालयात अद्यापही आयसोलेशन वॉर्ड तयार नसल्याचे वास्तव समोर आले आहे. पंधरा दिवस उलटूनही आयसोलेशन वॉर्ड तयार नसल्याने कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांना इतर ठिकाणी पाठवले जात आहे.
सर्व संशयित रूग्णांना एकत्रच ईएमएस वॉर्डमध्ये ठेवले जात असून तिथं वेगवेगळं कंपार्टमेंट नसल्यानं संसर्गाचा धोका वाढला आहे. एकाच वॉर्डमध्ये ठेवण्यात आलेल्या संशयितांपैकी काही रूग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतायत, ज्यामुळं संपर्कातील रूग्णांनाही लागण होण्याचा धोका वाढलाय.
तसंच नर्स, डॉक्टर आणि इतर स्टाफला पुरेशी सुविधा देखील उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने याकडे तात्काळ लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
मुंबई डेंजर झोनमध्ये
आता या क्षणाला अर्धी मुंबई कोरोनासाठी डेंजर झोन झाली आहे. कोरोनाने झोपडपट्टीतही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना आता अर्ध्या मुंबईच्या दारात पोहोचला आहे. तो केव्हाही तुमच्या घरात येऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
मुंबईत कोरोना कसा पसरला आहे. मुंबईत अनेक भाग कंटेन्मेंट झोन ठरवण्यात आलेत. मुंबईतले हॉटस्पॉट निश्चित करण्यात आलेत आहेत. यात वरळी, मानखुर्द, वांद्रे , अंधेरी आदी ठिकाणचा समावेश आहे. ही मुंबईतली सर्वाधिक डेंजर झोनमधली ठिकाणे आहेत. यासह मुंबईत तब्बल १९१ कंटेन्मेंट झोन तयार झाले आहेत.
ज्या परिसरात कोरोनाचा रुग्ण सापडतो, त्या परिसराला पूर्ण सील केलं जातं. त्या भागातून कुणालाही बाहेर पडू दिलं जात नाही. तसंच कुणालाही आतमध्येही जाऊ दिलं जात नाही. या काळात त्या भागात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा महापालिका करते. तसंच या भागाचं निर्जंतुकीकरण केलं जातं. ज्या घरात कोरोनाचा रुग्ण सापडलाय, त्या मजल्यावरच्या किंवा आजूबाजूच्या काही घरांतल्या लोकांना वेगळ्या ठिकाणी हलवून त्यांना क्वारंटाईन आणि त्यांची तपासणी केली जाते, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईतले डेंजर झोन वाढतायत. या डेंजर झोनमध्ये झोपडपट्ट्यांचं प्रमाण जास्त आहे. तिथला कोरोना रोखणं हे प्रचंड आव्हानात्मक काम आहे. मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी महापालिका शर्थीचे प्रयत्न करतेय. पण त्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणं तेवढंच आवश्यक आहे. या घडीला जवळपास अर्धी मुंबई डेंजर झोनमध्ये आली आहे मुंबईकर घरी बसले नाहीत, किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही, तर अख्खी मुंबई डेंजर झोनमध्ये येईल, असे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांचे म्हणणे आहे.
मुख्य झोपडपट्ट्या आणि अंदाजे लोकसंख्या
कोरोनाचा सर्वाधिक धोका झोपडपट्टीला आहे. कारण दाटीवाटीने ही झोपडपट्टी वाढलेली आहे. मुंबईतील ५० ते ५५ टक्के लोक झोपडपट्टीत राहतात. इतर छोट्या छोट्या झोपड्यांचा विचार करण्यात आलेला नाही. अन्यथा ही लोकसंख्या किती असेल याचा अंदाज बांधलेला बरा.
- धारावी ( १० लाख, ३ नगरसेवक आहेत)
- विक्रोळी पार्क साईड ( ५ लाख)
- दहिसर ( गणपत पाटील नगर) (३.३० लाख)
-मानखुर्द ( महाराष्ट्र नगर) (२.३०लाख)
-वांद्रे ( भारत नगर) (५ लाख)
- कुलाबा ( गीता नगर) (२ लाख)
- कुर्ला ( क्रांती नगर) (२.१५ लाख)
-अँटॉप हिल (१.१५लाख)
- जोगेश्वरी (१ लाख)
- दिंडोशी/गोरेगाव ( २ लाख)