मुंबई : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढच होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या फार मोठी आहे. हीच साखळी तोडण्यासाठी मुंबई महापालिका आता 'मिशन झिरो' ही संकल्पना राबवणार आहे. मुंबईतील सहा विभागांमध्ये "मिशन झिरो" राबवण्यात येणार आहे. बोरिवली(आर मध्य), दहिसर(आर उत्तर), मालाड(पी उत्तर), कांदिवली(आर दक्षिण) भांडुप( एस विभाग), मुलुंड( टी विभाग) मधली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिकेचा नवा अॅक्शन प्लान - "मिशन झिरो" असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या दोन-तीन आठवड्यात रुग्णांचा शोध घेऊन आणि उपचार करण्यासाठी ५० फिरत्या दवाखान्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी भारतीय जैन संघटना, क्रेडाई -एमसीएचआय , देश अपनाये , बिल गेटस् फाऊंडेशन या संस्थांची मदत होणार आहे. "मिशन झिरो" या संकल्पनेमुळे मुंबईत वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट होवू शकते. 


"मिशन झिरो" उपक्रमाचा शुभारंभ आज अंधेरीच्या शहाजीराजे क्रिडा संकुल येथून होत आहे. सतत वाढणारी कोरोनाग्रस्तांची आकडेवारी देशाची चिंता वाढवणारी आहे. कोरोना रुग्ण वाढत असताना दिलासादायक बाब म्हणजे रुग्णांचा रिकव्हरी रेट सुधारला आहे. देशातील रिकव्हरी रेट वाढून ५५.७७ टक्के इतका झाला आहे.


काय आहे "मिशन झिरो"
मालाड, बोरिवली, दहिसर, कांदिवली, भांडुप, मुलुंड या परिसरातील रुग्णदुपटीचा कालावधी वाढवण्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे . या विभागातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी या परिसरात जाऊन रुग्णांची तपासणी करणार. औषधे दिली जाणार , कोरोना संशयित रुग्णांना त्वरीत वेगळे करुन कोविड टेस्ट केली जाणार. कोरोनाविषयीची जनजागृती केली जाणार.तसंच मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी ३६ दिवसांवरुन ५० दिवसांवर नेण्याचेही पालिकेचे लक्ष्य आहे.