`तबलिगी जमातबाबत राज ठाकरेंची वायफळ बडबड`, अबू आझमींची टीका
तबलिगी जमातबाबत राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर सपाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी टीका केली आहे.
मुंबई : तबलिगी जमातबाबत राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर सपाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी टीका केली आहे. राज ठाकरेंची वायफळ बडबड आणि सोशल मीडियावरून तबलिगी जमात आणि मुस्लिमांबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. तबलिगी जमातला जाणूनबुजून बदनाम केलं जात आहे, असंही अबू आझमी म्हणाले. तसंच शरद पवारांशी चर्चा करून याबाबतचा सरकारचा गैरसमज दूर करू, असं आश्वासन राजेश टोपेंनी दिल्याचं अबू आझमी यांनी सांगितलं.
निझामुद्दीनमध्ये राहणाऱ्या लोकांची चौकशी झाली होती. एवढच नाही तर WHO तिकडून ३३ जणांना आपल्यासोबत घेऊन गेले होते. मौलाना साद यांची याबद्दल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चाही झाली होती. जमातने सगळी माहिती पोलीस आणि प्रशासनाला दिली होती. कोणतीच गोष्ट लपवण्यात आली नव्हती, असा दावा अबू आझमी यांनी केला आहे.
तबलिगी जमातच्या दिल्लीच्या निझामुद्दीनमध्ये झालेल्या कार्यक्रमावर राज ठाकरेंनी टीका केली होती. मरकजच्या आयोजकांना गोळ्या घालून ठार केले पाहिजे, असे खळबळजनक वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी केले. निवडणुकीच्या कुणाला मतदान करावे सांगायला येणारे मुल्ला मौलवी आहेत कुठे ? अशी विचारणाही राज ठाकरेंनी केली.
डॉक्टर लोक जीव धोक्यात घालून काम करत आहेत आणि या डॉक्टरांवर हल्ला करण्यात येतो. ही बाब खूप गंभीर आहे. अशा मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांची वैद्यकीय उपचार बंद करायला हवे. लोकांच्या अंगावर थुकतायत का, या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल करायला हवेत. धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही, असे राज ठाकरे यांनी ठणकावले.