मुंबई : कोरना व्हायरसने भारतामध्ये थैमान घातलं आहे. महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनीही कोरोना टेस्ट करून घेतली आहे. सुदैवाने अमित देशमुख यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. खोकला आणि ताप आल्यामुळे डॉक्टरांनी कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला दिला होता, यानंतर मी मुंबईच्या जेजे रुग्णालयात कोरोना टेस्ट करुन घेतल्याचं अमित देशमुख यांनी सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रकृती ठीक आहे, तसंच काळजी करण्याचं कारण नाही. आणखी ४ दिवस घरातून काम करणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर कार्यालयातून काम पाहू, असं अमित देशमुख म्हणाले आहेत.



वैद्यकीय शिक्षण मंत्री असल्यामुळे आपल्याला लागण झाल्यास इतरांना प्रादुर्भाव होऊ नये, तसंच कुटुंबियांनाही त्रास होऊ नये, यासाठी आपण चाचणी करुन घेतली. ज्यांना सर्दी, खोकला आणि ताप याची लक्षणं दिसत असतील त्यांनी राज्य शासनाने सुरू केलेल्या फिवर ओपीडीमध्ये जावं. आजार लवकर लक्षात आला तर लवकर उपचार करणे आणि लवकर बरे होणे शक्य आहे, अशी प्रतिक्रिया अमित देशमुख यांनी दिली आहे. 


देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ५,२७४ एवढी झाली आहे, तर १४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ४१० जणांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे १०१८ रुग्ण आहेत, यातल्या ७९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर ६४ जणांचा मृत्यू झाला आहे.