कोरोनामुळे मुंबईच्या बाजारपेठेत चिनी वस्तूंचा तुटवडा
पुरवठा कमी असल्याने मास्कची किंमत वाढवण्यात येत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
मुंबई: जगातील अनेक देशांमध्ये थैमान घालणारा कोरोना व्हायरसचा दिल्लीत शिरकाव झाल्याने अनेकांच्या चिंता वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने आपण कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. मात्र, तरीही अनेक मुंबईकरांनी कोरोना व्हायरसची धास्ती घेतली आहे. यामुळे अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरायला सुरुवात केली आहे.
नेमक्या याच गोष्टीचा काही संधीसाधू व्यापाऱ्यांकडून फायदा उठवला जात आहे. त्यामुळे मुंबईत मास्कचा काळाबाजार सुरु आहे. एरवी साधारण किंमतीला मिळणाऱ्या साध्या मास्कसाठी मुंबईकरांना किमान २५ रुपये मोजावे लागत आहेत. पुरवठा कमी असल्याने मास्कची किंमत वाढवण्यात येत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, खरंच या मास्कचा पुरवठा कमी आहे की नफा कमावण्यासाठी हा डाव आहे, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रभाव मुंबईतील बाजारपेठांमध्येही दिसू लागला आहे. एरवी बाजारपेठांमध्ये सहजपणे मिळणारे चिनी बनावटीच्या इलेक्ट्रॉनिक आणि दैनंदिन वापरातल्या वस्तुंचा तुटवडा जाणवू लागला आहे. तसेच सजावटीसाठी वापरण्यात येणारे चिनी बनावटीच्या लाईटस् देखील बाजारात दिसेनाशा झाल्या आहेत. याशिवाय, चीनमधून येणारे मोबाईल आणि एक्सेसरीजच्या बाजारपेठेलाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे.
ही गोष्ट भारतीय उद्योगांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. आगामी काळात चीन कोरोना व्हायरसच्या तडाख्यातून सावरला तरी भारतीय बाजारपेठांमध्ये निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तुंचा पुरवठा पूर्ववत होण्यासाठी काही काळ जावा लागेल. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात 'मेक इन इंडिया' उत्पादनांना सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे.