मुंबई: सिंगल डोस घेतलेल्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर रूग्णसंख्या न वाढल्यास, सिंगल डोसवाल्यांसाठीही नियम शिथिल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. आरोग्यमंत्र्यांनी यासंदर्भात संकेत दिले आहेत. आता कोरोना लसीचा सिंगल डोस घेतलेल्यांसाठी एक चांगली बातमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही जर कोरोना लसीचा जरी एक डोस घेतला असेल तरी तुम्हाला येत्या काळात प्रवासाच्या तसच इतर सवलती मिळण्याची शक्यता आहे. सिंगल डोस घेतलेल्या लोकांसाठी निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार विचार करतं आहे.


गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. शिवाय मृत्यूचं प्रमाणही कमी झालंय. त्यामुळे आता सिंगल डोस घेतलेल्या लोकांसाठीही नियम शिथिल व्हावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक असल्याचं दिसत आहे. 


दिवाळीनंतर कोरोनाबाधितांची संख्या कमी राहिली आणि परिस्थितीत सुधारणा वाटली तर राज्य सरकार त्याबाबत सकारात्मक विचार करेल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. सध्या ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना लोकल प्रवासाची मुभा आहे. मॉल, थिएटर प्रवेशासाठीही दोन डोस बंधनकारक आहेत. याशिवाय बाहेरील राज्यातून येणा-यांनी दोन डोस घेतल्याचं प्रमाणपत्र दाखवल्यास त्यांना आरटीपीसीआर चाचणीचं बंधन असणार नाही. 


दोन डोसमधील अंतर 84 दिवस असल्यानं अनेकांना या सवलतींपासून वंचित रहावं लागतं आहे. सरकारनं अनेक निर्बंध हटवले असले तरी त्यासाठी दोन डोस बंधनकारक आहेत. मात्र लोकांनी आतापर्यंत दाखवलेला संयम कायम ठेवला तर दिवाळीही आनंदात जाणार आणि त्यानंतर सरकारकडून जनतेला आणखी दिलासा मिळणार अशी आशा करायला हरकत नाही.