मुंबई : कोरोना व्हायरसपासून बचावासाठी एअर इंडियाने मोठे पाऊल उचलले आहे. २८ मार्चपर्यंत इटलीला जाणारी सर्व विमाने रद्द केली आहेत. त्याचबरोबर एअर इंडियाने दक्षिण कोरियाला जाणारी विमाने देखील २५ मार्चपर्यंत रद्द केली आहेत.



इटलीत काय आहे स्थिती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कोरोना व्हायरस चीननंतर इटलीमध्ये सर्वाधिक दिसून आहे. इटलीत आतापर्यंत १०१४९ रुग्ण आढळून आले असून मंगळवारी १६८ जणांचा मृत्यू झाला. त्याआधी रविवारी इटलीत १३२ जणांचा मृत्यू झाला होता. बुधवारी सकाळपर्यंत इटलीत ६३१ जणांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. १०९  देशांमध्ये १ लाख १३ हजार २५० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून २०  हून अधिक देशांमध्ये ४००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.


इटलीत कोरोना विषाणूच्या सकंटामुळे सरकारने सर्व शाळा आणि विद्यापीठे १५ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील नागरिकांना घरातच थांबण्याची सूचना केली जात आहे. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी इटलीत ठिकठिकाणी तपासणी नाक्यांची निर्मिती करण्यात आली आहे.


 भारतात पर्यटकांना प्रवेश बंद


कोरोना विषाणूचा वाढता  धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. भारतात येणाऱ्या सर्व परदेशी पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला. १५ एप्रिलपर्यंत ही स्थगिती दिली आहे. यातून केवळ डिप्लोमॅटीक व्हिसा, युएन व्हिसा आणि इतर ऑफिशिअल व्हिसा यांना वगळण्यात आले आहे.


महाराष्ट्रात कोरोनाचे ११ रुग्ण


दरम्यान, महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रवेश झाला आहे. राज्यामध्ये कोरोनाचे ११ रुग्ण आढळले आहेत. यातले ८ रुग्ण पुण्याचे, २ रुग्ण मुंबईचे आणि १ रुग्ण नागपूरचा आहे. नागपूरमध्ये सापडलेला रुग्ण हा अमेरिकेतून भारतात परतला आहे. तर मुंबई आणि पुण्याचे रुग्ण ग्रुपने दुबईमध्ये गेले होते.