आजींच्या मदतीसाठी सरसावलं `कॉर्पोरेट जोडपं`
एक जोडपं जे फक्त माणुसकीच्या नात्याने मदतीसाठी पुढे सरसावलंय.
दक्षता ठसाळे, झी मीडिया, मुंबई : हल्ली धकाधकीच्या जीवनात कुणाशी शांतपणे बोलायला उसंत नाही. पण अशातच एक जोडपं जे फक्त माणुसकीच्या नात्याने मदतीसाठी पुढे सरसावलंय. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत होती. एक कार्पोरेट जोडपं आपुलकीच्या नात्याने आजीने बनवलेला नाश्ता स्टॉल लावून कांदिवलीत विकतंय. त्यांच्या अर्धांगवायू झालेल्या पतीच्या उपचाराकरता खारीचा वाटा उचलतंय.
या जोडप्याला शोधून 'झी 24 तास'ने त्यांच्याशी संवाद साधलाय. अगदी आठ दिवसांतच सोशल मीडियावर लोकप्रिय झालेल्या आणि चर्चेत आलेल्या अंकुश शाह आणि अश्विनी शेनॉय शाह यांच्याशी बातचीत केली.
अश्विनी आणि अंकुश हे दोघंही कॉर्पोरेटमध्ये उच्च पदावर कामाला आहेत. टार्गेट, मिटिंग आणि बिझी शेड्युलमुळे स्वतःकडे आणि खाण्याकडे लक्ष द्यायला वेळही नाही. अशावेळी घरी येऊन कुणीतरी मायेने जेवण बनवणारं मिळेल का? या शोधात हे दोघंजण होतं. अशातच त्यांची भेट 55 वर्षीय भावनाबेन पटेल यांच्याशी झाली. त्यांनी देखील सकाळी 5 वाजता येऊन जेवण बनवून देण्याचं कबूल केलं. जून महिन्यातच अंकुश शाह यांच्या आईचं निधन झाल्याने पुन्हा एकदा मायेने जेवण बनवून देणारी व्यक्ती त्या घरात आली होती.
ऑगस्ट महिन्यापासून भावनाबेन दररोज न चुकता सकाळी 5 वाजता अंकुश आणि अश्विनी यांच्याकरता जेवण बनवण्याकरता यायच्या. सकाळच्या ऑफिसला जायच्या गडबडीत भावनाबेन यांच्याशी ज्या थोडाफार गप्पा मारता येतील त्या मारून अंकुश आणि अश्विनी ऑफिसला जायच्या.
सप्टेंबर महिन्यात अंकुश यांच्या आईची तिसऱ्या महिन्यातील तिथी होती. यावेळी या जोडप्याला आईच्या नावाने अन्नदान करायचं होतं. यासाठी त्यांनी भावनाबेन यांना नाश्ता बनवणं जमेल का विचारलं? क्षणाचाही विलंब न करता त्यांनी देखील हो म्हटलं. फक्त जेवण माझ्या घरी येऊन तुम्हाला घेऊन जावं लागेल असं सांगितलं. दोघांनी देखील तयारी दर्शवली यावेळी पहिल्यांदा अंकुश भावनाबेन यांच्या घरी गेले. तिथे तर त्यांना धक्काच बसला अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या 10 बाय 10 च्या घरातल्या भावनाबेन कधीच दुःखी दिसल्या नाहीत.
पुढे दोन दिवस गेल्यानंतर अंकुश यांची पत्नी अश्विनीने भावनाबेन यांना आर्थिक मदत करण्याची तयारी दाखवली. तेव्हा भावनाबेन यांनी हसत सांगितलं,'पैसे नकोत. दान नको. पण तुमच्या ओळखीने कुठे काम मिळालं. तर खूप बरं होईल.' वयाच्या 55 व्या वर्षी मदत नाकारून मेहनत करण्याची तयारी दाखवणाऱ्या भावनाबेन यांच कौतुक वाटलं. त्यांची या वयात मेहनत करण्याची तयारी असेल तर आपण पण काही करी करायला हवं हा विचार शाह जोडप्याने केला.
अंकुश आणि अश्विनी कांदिवलीत येऊन फार काळ नव्हता झाला. त्यामुळे भावनाबेन यांना अशी मदत कशी करता येईल हा विचार दोघेही करत होते. यामध्ये चार पाच दिवस गेले. त्यानंतर दोघांनी कांदिवली स्टेशनला नास्ट्याचा स्टॉल लावण्याचा निर्णय घेतला. सर्व कल्पना भावनाबेन पटेल यांना सांगितल्यावर त्या देखील तयार झाल्या. आता पहाटे 3 वाजता उठून भावनाबेन शाह यांच्या घरी येतात. तिथेच सगळा नास्टा बनवतात. आणि तेथून सकाळी 5 ला शाह जोडपं कांदिवलीला स्टॉल लावतात.
22 सप्टेंबर रोजी फक्त पोहे, उपमा आणि साबुदाणा खिचडी स्टॉल लावला. सुरूवातीला अगदी दोन ते तीन प्लेट नाश्ता संपायचा. मग आम्ही उरलेला नाश्ता गरिबांमध्ये वाटून परत यायचो, असं अश्विनी सांगते. एक दिवस दिपाली भाटीया नावाच्या महिला स्टॉलवर आल्या. त्यांनी नाश्ता घेतला आणि आमच्या दोघांकडे बघून आम्ही रोजचे स्टॉल विक्रेते वाटलो नाही म्हणून संवाद साधला. तेव्हा त्यांना आमचा स्टॉल चालवण्या मागचा हेतू समजला. आमच्या परवानगीने फोटो काढून सोशल मीडिया फेसबुकवर 2 ऑक्टोबर रोजी पोस्ट शेअर केली. आणि अगदी बघता बघता ती पोस्ट व्हायरल झाल्याचं अश्विनी सांगते.
तेव्हापासून आतापर्यंत अगदी 8 दिवसांत आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. सुरूवातीला आम्ही फक्त 3 पदार्थ घेऊन स्टॉल लावायचो. आता आमच्या स्टॉलवर सात पदार्थ असल्याचं अश्विनी सांगते. तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली असं विचारलं असता अश्विनी सांगते,'आम्ही दहा वर्षांपासून परमपूज्य गुरूदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब यांच्या इथे जात आहोत. 'अहम युवा सेवा ग्रुप' मार्फत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी समाजसेवा करतो. लोकांच्या भल्याचं आपल्याला आपलं घरं सांभाळून जे करता येईल ते करावं अशी शिकवण आहे.
भावनाबेन पटेल यांच्या पतीला अर्धांगवायू झाला आहे. त्यांना 2 मुलं असून ते फार शिकलेले नसल्यामुळे साध्या ठिकाणी नोकरी करतात. रोजच्या गरजा भागवताना या कुटुंबाची दमछाक होत असल्यामुळे अर्धांगवायू झालेल्या पटेल यांच्या उपचाराकडे लक्ष देता आलं नाही. यामुळे शाह कुटुंब स्टॉलमधून मिळणारा सगळा नफा हा त्यांच्या उपचाराकरता वापरणार आहेत.
स्टॉलचे सर्व अपडेट फेसबुक पेजवर
https://www.facebook.com/AnnapoornaTVS/
हा स्टॉल कुठे आहे?
कांदिवली पश्चिम येथे सरोवर हॉटेलच्या अगदी समोर हा स्टॉल आहे.
स्टॉलची वेळ?
सकाळी 5 ते सकाळी 9.30 वाजेपर्यंत
नाश्त्याचे पदार्थ
पोहे, उपमाच, साबुदाणा खिचडी, शिरा, मेथी पराठा, पालक पराठा, मिक्स वेजीटेबल पराठा, इडली-चटणी आणि आता मागणीनुसार विकतचा बनमस्का पाव ठेवला जातो. सोशल मीडियाची चांगली बाजू शाह कुटुंबीयांच्या मदतीला आली. शाह जोडप्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या. ते करत असलेल्या कार्याला मदतीचा हातभार लावण्याची देखील इच्छा व्यक्त केली.