मुंबई : सत्ताधारी भाजप-शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि काही अन्य नगरसेवकांना मोठा धक्का बसलाय. कोल्हापूर महापालिकेच्या नगरसवेकांचं पद रद्द झाल्यानंतर आता मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेच्या नगरसेवकांवरही टांगती तलवार आहे. मुंबई महापालिकेतल्या पाच ते सहा नगरसेवकांचं भिवतव्य धोक्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीड वर्षाचा कालावधी उलटूनही या नगरसेवकांनी जात वैधता प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडे दाखल केले नसल्याची माहिती समोर आलीय. याचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे औरंगाबाद महापालिकेतल्या तीन नगरसेवकांचं पद धोक्यात आलंय. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अजूनही न्यायालयात खटला सुरू आहे.



दरम्यान,कोल्हापूर महानगरपालिकेत जात चोरणाऱ्या सर्वच पक्षांच्या नगरसेवकांना सर्वोच्च न्यायालयानं दणका दिलाय. तब्बल  १९ नगरसेवकांचे नगरसेवकपद सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलंय. वेळेत जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे न्यायालयानं हा निकाल दिलाय.


आता कोल्हापूर पाठोपाठ राज्यातल्या अशाच जात चोरणाऱ्या तब्बल ९ हजार लोकप्रतिनिधींवर पद रद्द होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. महापालिका, नगर परिषद आणि ग्रामपंचायतींना हा निर्णय लागू असणार. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा पोटनिवडणुका होतील.