माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (former Mumbai Police Commissioner Param Bir Singh) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (former Mumbai Police Commissioner Param Bir Singh) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवरील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी बुधवारी सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. त्याचे अध्यक्ष पोलीस उपायुक्त स्तरीय अधिकारी असतील. दरम्यान, त्याचवेळी परमबीर सिंह यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांना परदेशात जाता येणार नाही.
परमबीर सिंह यांच्याविरोधात ठाणे आणि मुंबईत चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केल्यानंतर सिंह यांनाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर परमबीर सिंह मुंबईत नसल्याने मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे.
खंडणी आणि अन्य आरोपांखाली गुन्ह्यांबाबत परमबीर सिंह यांना न्यायालयाने २८ जुलै पर्यंत दिलासा दिला होता. या त्याची मुदत संपण्याच्या पूर्वसंध्येलाच मुंबई पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही तर त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त गुन्हे अकबर पठाण यांची बदली सशस्त्र विभाग नायगाव येथे करण्यात आली असून एसीपी पाटील यांची सुद्धा बदली केली आहे.