मुंबई: भायखळ्यातील वीर जिजामाता भोसले उद्यानात म्हणजेच राणीच्या बागेत एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. या उद्यानातील हम्बोल्ट पेंग्विनने स्वातंत्र्यदिनी पिलाला जन्म दिला. भारतात प्रथमच पेंग्विनचा जन्म झाला आहे. त्यामुळे सर्वांनाच या नव्या पाहुण्याबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन वर्षांपूर्वी २६ जुलै २०१६रोजी राणीच्या बागेत हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले होते. त्यापैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाला. सात पैकी सहा पेंग्विनच्या जोडय़ा जुळल्या. त्यापैकी मिस्टर मोल्ट (नर)-फ्लिपर (मादी) या जोडीने ५ जुलैला अंडे दिले होते. अंडे दिल्यानंतर राणीच्या बागेतील डॉक्टर पेंग्विनवर लक्ष ठेवून होते. या पेंग्विनच्या पिलाचा जन्म सुखरूप होण्यासाठी डॉक्टरांकडून विशेष काळजी घेतली जात होती.


दरम्यान, एका लहान मुलीने या पेंग्विनच्या पिलाचे नाव मीच ठेवणार असा हट्ट धरला आहे. मिश्का मांगुर्डेकर असे या मुलीचे नाव असून ती अंधेरी येथे राहते. मिश्काने राणीबाग प्रशासनाकडे आकर्षक नावांची यादीच पाठवली आहे. पेंग्विनचे पिल्लू नर असल्यास त्याचे नाव अपॉलो, कुकी, वॉडलर आणि मादी असल्यास तिचे नाव वेलव्हेट, व्हॅनिला, आईस क्यूब यापैकी ठेवण्याचा आग्रह मिश्काने धरला आहे.