मुंबई : देशात कोरोना रुग्णांची वाढ होवू नये म्हणून सरकारकडून वारंवार सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु विरार येथील अर्नाळा गावात सोशल डिस्टन्सिंग फज्जा उडतानाचं चित्र दिसून आलं. याठिकाणी एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या अंत्यविधीसाठी ४०० ते ५०० जणांनी उपास्थिती दाखवली होती. मात्र यात धक्कादायक बाब म्हणजे अंत्यविधीनंतर त्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये एकच खळबळ माजली असून खाजगी रुग्णालयात कोरोना बाबतीत सुरू असलेला हलगर्जीपणा समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्नाळा येथील एका प्रतिष्ठित व्यक्तीला श्वसनाचा आणि यकृताचा त्रास होता. त्यामुळे त्याला वसईच्या कार्डिनल ग्रेसीस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णावर कोरोना चाचणीही करण्यात आली होती. मात्र तीन-चार दिवसांत उपचाराअंती या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांच्या मागणीनुसार रुग्णालयाने हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला..


त्यांनतर या व्यक्तीच्या कुटुंबियांकडून अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली.अर्नाळा येथील रिसॉर्ट व्यवसायात असलेल्या प्रतिष्ठित व्यक्तीचे निधन झाल्याचे कळताच अर्नाळ्यात वसई तालुक्यातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी अंत्यसंस्कारासाठी उपस्थिती दाखवली होती. 


मात्र रुग्णालयातून  त्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच वसईत एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना स्पर्श केलेले तसेच जवळील नातेवाईक असे मृतदेहाच्या संपर्कात आलेल्या एकूण ३६ जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.